36.5 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीय विशेषराजकारण्यांचे ‘स्कँडल्स’

राजकारण्यांचे ‘स्कँडल्स’

राजकारणातील साधनशुचिता लयाला जाऊ लागली त्याला बराच काळ लोटला. चारित्र्यवान राजकारण्यांचा शोध घेण्यासाठी आता हर्बलची दुर्बिणही कामी येणार नाही, अशी आजची स्थिती आहे. कधी बेसुमार संपत्तीच्या कारणामुळे असेल किंवा कधी गुन्हेगारी कृत्यांमुळे असेल, देशाच्या राजकारणातील नेते हे सातत्याने चर्चेत येत असतात. सध्या माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या मुलाचे व नातवाचे नाव सेक्स स्कँडलमुळे चर्चेत आले आहे. त्याचे व्हायरल व्हीडीओ आणि उपलब्ध माहिती पाहता हे राज्यातील सर्वांत मोठे सेक्स स्कँडल मानले जात आहे. यापूर्वीही काही नेत्यांची नावे अशा स्कँडल्समुळे चर्चेत आली होती. अशा प्रकरणांचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई व्हावी, ही जनतेची अपेक्षा असते.

चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखे असते, एकदा हातातून निसटले की पुन्हा पूर्ववत होत नाही, अशा आशयाचे एक सुवचन आहे. सार्वजनिक जीवनात तर व्यक्तीचे आचरण आणि चारित्र्य खूप महत्त्वाचे असते. पण अनेक राजकारणी याची दखल घेणे आवश्यक मानत नाहीत. कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हे त्याचे ज्वलंत उदाहरण ठरले आहेत. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना कर्नाटकात देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा आणि नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांचे नाव सेक्स स्कँडलमुळे चर्चेत आले आहे. रेवण्णा यांच्या घरात काम करणा-या मोलकरणीने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. प्रज्ज्वलच्या पेनड्राईव्हमध्ये २९०० पेक्षा जास्त अश्लील व्हीडीओ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे राज्यातील सर्वांत मोठे सेक्स स्कँडल असल्याचे तेथील महिला आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणामुळे भाजपची गोची झाली असून देवेगौडांच्या पक्षाला मोठा तडाखा बसला आहे. रेवण्णा यांच्यावर सुमारे तीन हजार महिलांचे लैंगिक शोषण, धमकावणे आणि त्रास देणे असे गंभीर आरोप आहेत. त्याच्या गैरवर्तणुकीचे व्हीडीओ सार्वजनिक झाल्यावर आणि या प्रकरणाला गती मिळू लागल्यावर राज्य सरकारने त्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले. तपास पथक तयार होताच रेवण्णा देश सोडून पळून गेल्याचे स्पष्ट होत आहे. येथून ते थेट जर्मनीत गेले आणि तेथून ते कोणत्यातरी युरोपीय देशात लपले आहेत, असे सांगितले जात आहे.

या प्रकरणामुळे कर्नाटकात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. विरोधी पक्षांनी केवळ भाजपच नव्हे तर पंतप्रधानांवरही निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. जेडीएसच्या कोअर कमिटीने रेवण्णा यांना पक्षातून निलंबित केले आहे. पण या प्रकरणाचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपा-जनता दल आघाडीला बसू शकतो.
निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच हे व्हीडीओ पेनड्राईव्हमध्ये भरून लोकांमध्ये वेगाने पसरू लागले होते. पण रेवण्णाच्या घरात काम करणा-या एका मध्यमवयीन मोलकरणीने आरोप केल्यानंतर या प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे भाजपच्या एका नेत्याने हे व्हीडीओ वर्षभरापूर्वी त्यांच्याकडे उपलब्ध झाले होते आणि त्यांनी पक्षाच्या केंद्रीय समितीला रेवण्णांना निवडणुकीचे तिकिट दिले जाऊ नये अशी विनंती केली होती; परंतु त्याकडे लक्ष दिले गेले नाही. सुमारे वर्षभरापूर्वी याच प्रकरणात रेवण्णा यांनी स्वत: कोर्टातून स्थगिती आदेश आणल्याचीही माहिती समोर आली आहे. म्हणजेच हे प्रकरण अजिबात ताजे नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे राजकीय सत्तेच्या दबावाने हे प्रकरण दाबण्यात आले आणि रेवण्णांना पुन्हा लोकसभा निवडणुकीत उतरण्याची संधी देण्यात आली.
आता संपूर्ण प्रकरणाविषयीची माहिती समोर येऊ लागल्यानंतर कर्नाटकातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष माजला आहे. याचे कारण रेवण्णा यांनी कोणत्याही वयोगटातील आणि वर्गातील महिलांना सोडले नाही असे या व्हीडीओतून स्पष्ट होत आहे.

घरगुती मदतनीस, सरकारी अधिकारी-कर्मचारी, पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून सर्व प्रकारच्या महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ते स्वत: त्यांच्या या घृणास्पद कृत्यांचे व्हीडीओ बनवायचे, जेणेकरून त्या महिलांना धमकावून त्यांना गप्प राहण्यास भाग पाडू शकतील. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवण्णाच्या वासनेच्या बळी ठरलेल्यांमध्ये राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी किंवा काही कामानिमित्त भेटायला येणा-या महिला व मुलींचा समावेश आहे. या मुलींमध्ये काही जिल्हा पंचायत सदस्य, पोलिस कर्मचारी आणि इतर अनेक सरकारी विभागातील कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. राजकीय नेत्यांची नावे सेक्स स्कँडल्समध्ये समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. बाबूलाल नागर, हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा, मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री असणा-या जगजीवन राम यांचा मुलगा सुरेश राम, महिपाल मदेरणा आणि भंवरी देवी, एन. डी. तिवारी अशी अनेक उदाहरणे देशाने पाहिली आहेत. २०१३ मध्ये मध्य प्रदेशचे अर्थमंत्री राघवजी यांच्यावर घरातील मोलकरणीचे शोषण केल्याचा आरोप झाला होता. कायमस्वरूपी सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप सेविकेने केला. त्यावेळी राघवजी ७९ वर्षांचे होते.

या प्रकरणाची सीडी बाहेर येताच राघवजींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. याच वर्षी जयपूरमधील एका महिलेने राजस्थानचे माजी मंत्री बाबूलाल नागर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. तत्पूर्वी २०१२ मध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्यावर सेक्स स्कँडलचे आरोप झाले होते. भारतातील बड्या वकिलांमध्ये अभिषेक मनु सिंघवी यांचे नाव घेतले जाते; पण सिंघवी हे सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या चेंबरमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले होते. सिंघवी यांचा ड्रायव्हर मुकेश कुमार लाल याच्यावर त्याची सीडी बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. सिंघवी यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रवक्ते आणि कायदा व न्यायविषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा यांचेही नाव एअर होस्टेस गीतिका शर्मा यांच्या लैंगिक शोषणामुळे चर्चेत आले होते. गीतिका ही कांडा यांच्या एमएलडीआर एअरलाइन्सशी संबंधित होती आणि लैंगिक छळाची शिकार झाल्यानंतर तिने २०१२ मध्ये आत्महत्या केली होती. गीतिकाने तिच्या सुसाईड नोटमध्ये कांडावर आरोप केले होते. यानंतर कांडा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

तथापि, ४ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने कांडा यांची निर्दोष मुक्तता केली. २०११ मध्ये राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारमधील जलसंपदा मंत्री महिपाल मदेरणा यांच्यावर झालेल्या भंवरी देवी सेक्स स्कँडलच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. भंवरी देवी जोधपूरच्या जालीवारा गावातील एका उपकेंद्रात सहायक परिचारिका (दाई) म्हणून काम करत होत्या. सप्टेंबर २०११ मध्ये त्या बेपत्ता झाल्यानंतर त्यांचे पती अमरचंद यांनी महिपाल मदेरणा यांच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केल्याचा आरोप केला होता. भंवरीसोबतची मदेरणा यांची सीडी सार्वजनिक झाल्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मदेरणा यांची हकालपट्टी केली आणि नंतर त्यांना सीबीआयने अटक केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी हे एकेकाळी भारतीय राजकारणातील एक शक्तिशाली राजकारणी मानले जात होते. एन. डी. तिवारी २००९ मध्ये आंध्र प्रदेशचे राज्यपाल असताना त्याच वर्षी त्यांची कथित सेक्स सीडी वृत्तवाहिन्यांमधून समोर आली होती. यामध्ये ते तीन महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसले होते.

-सत्यजित दुर्वेकर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR