अन्यथा माघार नाही, जरांगेंचा इशारा
जालना : प्रतिनिधी
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले असून, गेल्या ४ दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारने जालन्याचे पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिका-यांना पाठवले. त्यावर जरांगे पाटील यांनी या अधिका-यांना का पाठवले, असा सवाल करीत जोपर्यंत राजकीय नेतृत्व येथे येऊन स्पष्ट आश्वासन देत नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारशी संघर्ष सुरु केला.
जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. आज दुपारी सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगेंना भेटायला येणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु दुपारी कोणताही मंत्री आला नाही. त्यानंतर रात्री उशिरा जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जरांगे यांच्या भेटाला आले. मात्र, मनोज जरांगे यांनी अधिका-यांना माझ्याकडे का पाठवले, तुम्हा नेत्यांना येता येत नाही का, असा असा सवाल या शिष्टमंडळाला केला.
हा अधिका-यांचा विषय नाही. अधिका-यांनी माझ्याकडे येऊ नये. सर्व मागण्या पूर्ण करून माझ्याकडे जीआर घेऊन या, असे या शिष्टमंडळाला स्पष्टपणे सांगितले. उद्या सकाळपर्यंत सर्व मागण्यांचा जीआर निघाला पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
नोंद सापडली त्यांना
प्रमाणपत्र मिळणारच
जेवढ्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे. जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळाला पाहिजे, यासाठी ही प्रक्रिया अधिकाधिक सोपी कशी होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. चार महिने कॅम्प लाऊन आपण त्याचा सर्वांना फायदा देऊ शकतो, असे अधिका-यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना सांगितले.
बीडमध्ये टायर
जाळून संताप
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस होता. आज त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मराठा समाज बांधव आक्रमक होत असून, सरकारच्या निषेधार्थ बीडच्या पाडळसिंगी टोलनाक्यासमोर मराठा समाज बांधवांनी टायर जाळून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.
















