मुंबई : प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास सांगणारा ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर मोठ्या दिमाखात उभा आहे. आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आठव्या दिवशी भारतभरातून ६६.३८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दमदार कथानक, तगडी स्टारकास्ट, अजय-अतुल यांचे अंगावर शहारे आणणारे संगीत अशा अनेक कारणांमुळे आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या रांगेत तिस-या स्थानावर ‘राजा शिवाजी’ पोहोचला आहे.
छत्रपती शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित असणारा रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनीत ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग डेलाच ११.३५ कोटी रुपयांची कमाई केली. आठवडाभरात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने भारतभरात सुमारे ६६.३८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या वीकेंडचा या चित्रपटाला आणखी फायदा होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाचे लाईफ टाईम कलेक्शन १०० कोटींवर पोहोचू शकते.
दिग्गज कलाकारांची फौज
छत्रपती शिवरायांच्या शौर्यावर आधारित असणारा राजा शिवाजी हा ‘पिरियड ड्रामा’ आहे. त्यामुळे या सिनेमात अनेक दिग्गज कलाकार पाहायला मिळतात. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, भाग्यश्री पटवर्धन, सचिन खेडेकर, जिनिलिया देशमुख, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते यांचा यात समावेश आहे.
















