मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचे मराठमोळे अभिनेते रितेश देशमुख यांचा बहुचर्चित सिनेमा ‘राजा शिवाजी’ पुढील वर्षी प्रदर्शित होत असून आज स्वत: रितेश देशमुख यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रितेश यांनी या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून काही दिवसांपूर्वीच त्याचा शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे, आता ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची उत्सुकता सर्वांना लागली असून आता चित्रपटाची तारीख जाहीर केल्याने प्रतीक्षा संपली आहे.
दरम्यान,अभिनेता म्हणून रितेश देशमुख यांचा चाहता वर्ग मोठा आहे, तर महाराष्ट्रात मराठमोळे रितेशभाऊ. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे ते चिरंजीव आहेत. रितेश देशमुखांच्या प्रत्येक चित्रपटावर मराठी प्रेक्षक सातत्याने प्रेम करतो. ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून रितेश यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सिनेमातून रितेश यांची बॉलिवूडमध्ये हीट एन्ट्री झाली. त्यानंतर, अनेक चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले असून ‘लय भारी’ आणि ‘वेड’ या मराठी चित्रपटांतून पुन्हा एकदा त्यांनी सिनेरसिकांची मने जिंकली आहेत.
आता, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदुस्थानचे महापराक्रमी राजे शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट घेऊन रितेश देशमुख चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. रितेश यांच्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून होती. आता, या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र दिनी सिनेमा प्रदर्शित
१ मे २०२६ रोजी म्हणजे महाराष्ट्र दिनीच ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून ६ विविध भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये राजा शिवाजी सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने देशभरातील विविध राज्यांतील चाहत्यांना त्यांच्या भाषेत सिनेमाची कथा आणि गौरवशाली इतिहास पाहण्याचा आनंद मिळणार आहे.