लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि माईर पुणे संचलित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पंदन २०२५’ या दोन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य कला महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि. २५ एप्रिल आणि शनिवार, २६ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, समन्वयक डॉ. सुनील फुगारे आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
महोत्सवाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे नृत्य स्पर्धा असून, यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि इतर आरोग्य शिक्षण संस्थांतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होणार आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली नृत्यकला, सृजनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव सादर करण्याची अनमोल संधी मिळणार आहे. लातूर येथे अशी भव्य राज्यस्तरीय नृत्य कला स्पर्धा आयोजित होणे ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
‘स्पंदन २०२५’ नृत्य कला महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक अभिरुची वृद्धिंगत करण्याबरोबरच एकात्मता आणि सामूहिक सहभागाचे प्रतीक ठरणार आहे. या महोत्सवाचे समन्वयक म्हणून डॉ. शितल फड आणि डॉ. सलीम शेख हे काम पाहणार आहेत. या राज्यस्तरीय नृत्य कला महोत्सवात महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय व आरोग्य शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड व प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांनी केले आहे.