Homeमहाराष्ट्रराज्यात उष्णतेच्या लाटेचे संकट

राज्यात उष्णतेच्या लाटेचे संकट

अनेक भागात उष्णतेचा अलर्ट जारी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यभरातील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे राहिले आहे. अशात आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा देत राज्यात उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. तसेच, मुंबईसह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आजपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामध्येच काही भागात पावसाचाही अंदाज वर्तवण्याक आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ५ मे पर्यंत मुंबईत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. आज उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून उष्णघाताच्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. हवेतील आद्रता ७०-८० टक्क्यांवर राहील. कमाल तापमान ३३-३७ अंशांच्या दरम्यान राहील, असाही अंदाज वर्तलला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात उष्णतेचा पारा चढलेला आहे. कमाल तापमान ३७-४० अंशांच्या दरम्यान आहे. हवामान उन्हाळी कोरडे राहील. काही ठिकाणी हलकी उष्णतेची लाट जाणवेल.

उत्तर महाराष्ट्रात देखील उन्हाचे चटके कायम आहेत. आज कमाल तापमान ४० अंशांपर्यंत राहील. हवामान उष्ण आणि कोरडे राहील. वादळी पावसाची कोणतीही शक्यता नाही. मराठवाडा चांगलाच तापला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला १-२ अंशांनी तापमानात घट झालीये. तरीही उन्हाचा पारा ३७- ४२ अंशांपर्यंत चढलेला आहे. पुढील काही काळ हिट वेव्ह सारखी स्थिती कायम राहील. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट असल्याची स्थिती जाणवेल. ३ मेपासून पुन्हा विदर्भात अवकाळी पाऊस सक्रीय होत आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोणताही धोक्याचा अलर्ट नाही. तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

दुपारी घराबाहेर पडणे टाळावे.
गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असतानाच भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. मागील दोन दिवस तापमान ४३ ते ४४ अंशांवर होते, तर सध्या ते ४२ अंशांवर आले आहे. ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहणार असून तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR