सोलापूर : राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन दुष्काळाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी सोलापूर, धाराशिवसह इतर दुष्काळग्रस्त भागांत तातडीने मदत देण्याची गरज असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील १३९ गावांना दुष्काळाचा फटका बसला असून १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माढा तालुक्यातही पाण्याची मोठी टंचाई आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठाही कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याची गरज पवारांनी व्यक्त केली. दिवाळीनंतर पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या संकटात शेतक-यांना आर्थिक मदत आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
















