पुणे : प्रतिनिधी
राज्यातील उसाचा गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून आजतागायत २९ लाख टन साखर उत्पादन तयार झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान साखरेचा किमान विक्री दर ४१०० रुपये असावा अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी शासनाकडे केली आहे.
साखर आयुक्त कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या महितीनुसार राज्यात डिसेंबरअखेर १९० साखर कारखान्यांतून २९ लाख टन साखर तयार केली आहे. यामध्ये ९६ सहकारी आणि ९४ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. १५ नोव्हेंबरला उसाचा गाळप हंगाम सुरू झाला आणि आजवर ३३८ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून सरासरी उतारा ८.६ टक्के मिळाला आहे. ऊस गाळप, साखरेचे उत्पादन आणि उतारा यामध्ये राज्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.
यंदाच्या हंगामात राज्यातील ऊस गाळप हंगामात अंदाजे १०० ते १०२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये सुमारे १२ लाख टनाच्या जवळपास साखर इथेनॉलसाठी वळविण्याचा अंदाज आहे. तसे झाले तर साखर उत्पादन ९० लाख टनपर्यंत खाली येणे शक्य आहे तसेच इथेनॉल दरात ३ ते ५ रुपयांची वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.