लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या केंद्रावर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात सुरु आहे. दि. ४ डिसेंबरपासून सुरु असलेल्या या नाट्य स्पर्धेस नाट्यरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १३ नाट्य संघांनी सहभाग घेतला आहे. लातूर शहर एक सांस्कृतिक शहर असल्यामुळे येथे नाट्यरसिकांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच स्पर्धेच्या अगदी उद्घाटन सत्रापासून नाट्यरसिकांची गर्दी होत आहे. स्पर्धेतील नाटकाची सुरुवात अगदी वेळेवर म्हणजेच दररोज सायंकाळी ७ वाजता तीसरी घंटा वाजत असल्यामुळे नाट्यरसिक अगोदरच सभागृहात येऊन आसनस्थ होत आहेत. विविध विषयांवरील नाटकं सादर होत आहेत. त्याचा लातूरचे नाट्यरसिक मनमुराद आनंद घेत आहेत. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक बिभीषण चवरे व लातूर केंद्राचे समन्वयक बाळकृष्ण धायगुडे परिश्रम घेत आहेत.