23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeसंपादकीयराधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती

राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती

महाराष्ट्राचे राज्यपाल व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. त्यांची देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. एकूण ७६८ मतांपैकी १५ मते अवैध ठरली. विजयासाठी ३९४ मतांची गरज होती. संसदेच्या दोन्ही सदनांमधील ७८१ पैकी ७६८ सदस्यांनी मतदान केले. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीकडे ३१५ मते होती. त्यामध्ये लोकसभेतील २३० व राज्यसभेतील ७६ मतांचा समावेश होता. दोन्ही सभागृहातील ९ अपक्षांचाही त्यांना पाठिंबा होता. आम आदमी पक्ष इंडिया आघाडीमध्ये नसला तरी लोकसभेतील ३ व राज्यसभेतील ९ अशी १२ मते इंडिया आघाडीचे उमेदवार रेड्डी यांना दिली जातील असे ‘आप’ने जाहीर केले होते त्यामुळे इंडिया आघाडीला ३२७ मते मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात विरोधकांना ३०० मते मिळाली. एनडीएला २५ मते जास्त मिळाली म्हणजेच विरोधकांची २५ मते फुटली. चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरूपूर येथे झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव सी. के. पोन्नुस्वामी तर आई. के. जानकी अम्मल. तुतीकोरिन येथील चिदम्बरम कॉलेजमधून त्यांनी व्यवसाय प्रशासनाची पदवी प्राप्त केली. राधाकृष्णन यांना टेबल टेनिस, क्रिकेट, व्हॉलिबॉल आणि लांब पल्ल्याच्या धावण्याची आवड आहे. कॉलेज जीवनात ते टेटेचे चॅम्पियन होते. राधाकृष्णन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चार दशकांहून अधिक काळाचा संबंध आहे. १९७४ मध्ये ते भारतीय जनसंघाच्या तामिळनाडू राज्य कार्यकारिणीचे सदस्य झाले. १९९६ मध्ये त्यांची तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. १९९८ आणि ९९ मध्ये ते कोइमतूर लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. कापडावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच सार्वजनिक उपक्रम, वित्त सल्लागार समिती आणि स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याच्या चौकशीचे संसदीय विशेष समितीचे सदस्य होते. २००४ ते ०७ दरम्यान ते तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी १९०० कि. मी.ची रथयात्रा काढली होती. झारखंड (२०२३-२४) आणि महाराष्ट्राचे (जुलै २०२४) राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. तेलंगणा आणि पुदुच्चेरीचे उपराज्यपाल म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे

. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी ते महत्त्वाचे नेते मानले जातात. राधाकृष्णन यांचा विजय भाजपच्या ‘मिशन साऊथ’चा भाग मानला जातो. राधाकृष्णन हे तामिळनाडूतील ओबीसी गौंडर-कोंगु वेल्लाल समुदायातील आहेत. आतापर्यंत उपराष्ट्रपती निवडणुकीच्या इतिहासात ४ वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५२, ५७), मोहम्मद हिदायतुल्लाह (१९७९) आणि डॉ. शंकर दयाळ शर्मा (१९८७), डॉ. के. आर. नारायणन यांनी १९९२ मध्ये ७०० मतांसह सर्वांत मोठा विजय मिळवला होता. राधाकृष्णन यांची निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. लवकरच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या उद्देशानेच राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन तामिळनाडूच्या जनतेला आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे सांगण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे.

अत्यंत बिकट परिस्थितीतदेखील राधाकृष्णन यांनी भाजपला नेहमीच साथ दिली होती त्याचे फळ त्यांना आता प्राप्त झाले आहे. वास्तविक राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांना पक्षीय राजकारण लागू असू नये; परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधारी पक्ष ज्या उमेदवाराला उभा करतो तो हे पद प्राप्त करीत असतो. आता राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राज्यसभेमध्ये एकाहून एक हुशार मंडळी असतात त्यामुळे त्यांना कसे हाताळायचे याचे कसब राधाकृष्णन यांना असणे आवश्यक आहे. जरी ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असले तरी त्यांना एक निष्पक्ष सभापती या नात्याने राज्यसभेत वावरावे लागणार आहे. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनुकरण सी. पी. राधाकृष्णन यांनी करायला हवे. अगोदरच्या राष्ट्रपतीचा-उपराष्ट्रपतींचा अनुभव आणि त्यांची कार्यपद्धती याचा बारकाईने विचार करावा लागेल. विरोधी पक्षालादेखील त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा राहतील. या निवडणुकीत १५ मते अवैध ठरली ही फार मोठी गंभीर बाब आहे. सर्व खासदारांना त्यांच्या राजकीय पक्षांनी प्रशिक्षण दिल्यानंतरही अशा पद्धतीने १५ मते अवैध ठरावित हे धक्कादायक आहे. सुशिक्षित व प्रतिष्ठित व्यक्तीही चुकीच्या पद्धतीने मतदान करतात, ही दुर्दैवी बाब आहे.

या निवडणुकीतील मतदानानंतर केंद्रातील सरकार कोसळेल, असे भाकित राहुल गांधी यांनी केले होते; परंतु तसे काही झाले नाही. ही निवडणूक चुरशीची होईल, असे म्हटले जात होते; परंतु प्रत्यक्षात तसे काही दिसले नाही. या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे पराभूत उमेदवार सुदर्शन रेड्डी म्हणाले, खासदारांनी आपला जो निर्णय दिला तो मी प्रामाणिकपणे आणि आपल्या लोकशाहीवरील अढळ विश्वासाने स्वीकारतो. भले निवडणुकीचा निकाल आपच्या बाजूने लागला नाही; परंतु ज्या मोठ्या उद्देशासाठी ते सर्व जण मिळून संघर्ष करत होते, तो आताही सुरू आहे. विचारधारेची ही लढाई आणखी ताकदीने सुरू राहील. उपराष्ट्रपतीपदी निवड झालेल्या राधाकृष्णन यांना सुदर्शन रेड्डी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यकाळात देशाची सेवा करण्यात त्यांना यश लाभो, असे रेड्डी म्हणाले. आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR