लातूर : प्रतिनिधी
रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी संबंध भारतभरात रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने लातूर शहरात ‘आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन’ने प्रसाद स्वरूपामध्ये मोगरा, जास्वंद, गुलाब, तुळस अशा सातशे फुल झाडांचे वाटप केले. भक्ती नगर मधील राम मंदिर, रायगड मंगल कार्यालय परिसरातील राम मंदिर, गुळ मार्केट समोरील राम मंदिर या ठिकाणी आलेल्या सर्व राम भक्तांना फुल झाडांचे वाटप केले.
दरम्यान,‘आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन’ सदस्यांनी मागील कित्येक वर्षापासून ‘हरित घर’ हा उपक्रम सुरू ठेवलेला आहे. प्रत्येक सण उत्सव झाडासोबत, निसर्गासोबत साजरा करावा हा या पाठीमागचा उद्देश आहे. घराघरांमध्ये झाडांची, फुल झाडांची, शोभिवंत झाडांची संख्या वाढावी याकरिता ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन च्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत आहेत. विविध सण उत्सवानिमित्ताने झाडांचे प्रसाद स्वरूपात वाटप केले जाते.
रामनवमी निमित्ताने ७०० घरामध्ये प्रत्येकी एक झाड स्थापित झालं याच ग्रीन लातूर वृक्ष सदस्यांनी आनंद साजरा केला. मागील सहा वर्षात यापध्दतीने विविध सण उत्सव निमित्ताने ऐंशी हजार पेक्षा अधिक फुलझाडांचे फळझाडांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता श्वेता यादव, अॅड. वैशाली लोंढे, किरण जाधव, नितीन कामखेडकर, दयाराम सुडे, आकाश सावंत, रवी तोंडारे, अरविंद फड, शुभम आव्हाड, महेश गेलडा यांनी परिश्रम घेतले.