24.9 C
Latur
Sunday, May 25, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला ठाकरे, पवारांसह चव्हाणांचा नकार, तर शिंदेंची दांडी

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला ठाकरे, पवारांसह चव्हाणांचा नकार, तर शिंदेंची दांडी

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचा तिसरा दिवस जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मात्र शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला यायला नकार दिला, तर महायुतीचा घटक असूनही एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचा तिसरा दिवस जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. मात्र शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमाला यायला नकार दिला, तर महायुतीचा घटक असूनही एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाने राज्यातल्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचे ठरवले होते. त्यात महायुतीत असलेले माजी मुख्यमंत्री सहभागी झाले, पण महाविकास आघाडीत असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणे पसंत केले.

माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपावासी झालेल्या नारायण राणे, अशोक चव्हाण यांना निमंत्रण देण्याचे प्रयोजन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने केले होते. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवली. महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते, पण त्यांनी ते निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, अशोक चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांना सुनावले
अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागानंतर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा होती. अशातच एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला येणे टाळले. त्यांच्याऐवजी शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीने चर्चांना आणखी बळ मिळाल्याचे दिसून आले.

सन्मान ज्याचा त्यानेच स्वीकारला पाहिजे
याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कार्यक्रमात जाहीर नाराजी बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे मला तुम्हाला सांगायचे आहे की, तुम्हाला यायला जमणार नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका. मी प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज नाही. कारण आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केले आहे. पण असंच सुरू राहिलं तर प्रत्येकजण प्रतिनिधी पाठवत जाईल. हा कार्यक्रम माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यासाठी आहे. १३ कोटी जनतेचे प्रतिनिधित्व केलेल्यांचा हा सन्मान आहे. त्यामुळे हा सन्मान ज्याचा आहे, तो त्यानेच स्वीकारला पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR