मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेश दौ-यात केंद्र सरकारच्या धोरणांवर केलेल्या टिकेवरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. रविवारी (२१ सप्टेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी खासदार राऊत यांनी राहुल गांधींनी घेतलेल्या भुमिके समर्थनही केले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, भारताच्या परराष्ट्र धोरणाची सद्यस्थिती काय आहे? हे राहुल गांधी अत्यंत सोप्या शब्दांत जनतेला समजावून सांगत आहेत. मोदींचे विदेश धोरण कसे कोसळले आहे, हे अंधभक्तांनाही आता कळू लागले आहे. याच गोष्टीची देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असतील, तर याचा अर्थ भाजप पूर्णपणे हादरलेला आहे. आता मोदी पप्पू आहेत, राहुल गांधी नाही. राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत आणि लोक त्यांना मान-सन्मान देतात. असे म्हणत समर्थन केले. तसेच, राहुल गांधींनी मारलेला बाण भाजपच्या काळजात आरपार घुसला आहे. राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी या लोकांनी शेकडो कोटी रुपये खर्च केले, पण आता याच राहुल गांधींनी मोदींना ‘पप्पू’ ठरवले आहे. असा घणाघातही त्यांनी यावेळी केला आहे.
पंतप्रधान मोदी लोकसभेत आणि बाहेर पंडित नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नक्कल करत अनेक कॉमेडी प्रकार करत असतात. हा काय प्रकार आहे? देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर जोकरांची फौजच आहे. विरोधी पक्षाला उत्तम नट असायलाच लागते. अभिनयाचा ठेका काय फक्त मोदींनीच घेतलाय का? राहुल गांधी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे हे सर्वजण उत्तम अभिनय करून जनतेला विषय समजावून सांगू शकतात, असे म्हणत खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
युपीआयबाबत विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा भाजपचा आरोप आहे. यावर खासदार राऊत म्हणाले की, कोणीही फेक नॅरेटिव्ह पसरवत नाही. पेट्रोल पंपचालक, दुकानदार जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, त्यांना काय कळत नाही का? देवेंद्र फडणवीसांना नेमकी समस्या काय आहे? हेच समजत नाही. कोणताही विषय समजून घेण्याच्या ते पलीकडे गेले आहेत. मला वाटते, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांना चांगल्या दवाखान्यात घेऊन जात त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
















