नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नोव्हेंबर २०२४ मध्ये जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आपल्या सोन्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ केली. जगभरात वाढलेला भू-राजकीय तणाव, महागाईच्या परिणामामुळे सोन्याच्या खरेदीत तेजी दिसून येत आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल अर्थात ‘डब्ल्यूजीसी’च्या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये मध्यवर्ती बँकांनी मिळून ५३ टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे यात भारताचेही मोठे योगदान आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल यांच्यानुसार आरबीआयने नोव्हेंबरमध्ये ८ टन सोने खरेदी केले, त्यानंतर आरबीआयचा एकूण सोन्याचा साठा ८७६ टन झाला आहे. अशा प्रकारे भारताने २०२४ मध्ये एकूण ७३ टन सोने खरेदी केले.
भारत दुस-या क्रमांकावर : डब्ल्यूजीसीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, २०२४ मध्ये सोने खरेदीच्या बाबतीत भारत पोलंडनंतर दुस-या क्रमांकावर आहे. आकडेवारीनुसार पोलंडच्या नॅशनल बँकेने २०२४ मध्ये सर्वाधिक ९० टन सोने खरेदी केले. यानंतर पोलंडचा एकूण सोन्याचा साठा ४४८ टनांवर पोहोचला आहे. पोलंडच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा १८ टक्के आहे. पोलंडव्यतिरिक्त उझबेकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने नोव्हेंबरमध्ये ९ टन सोने खरेदी केले आणि एकूण सोन्याचा साठा ३८२ टन इतके झालेले आहे.
चीनच्या पिपल्स बॅँकेने ६ महिन्यांनंतर ५ टन सोने खरेदी केले आणि आता चीनचा एकूण सोन्याचा साठा २,२६४ टनांवर पोहोचला आहे, जो चीनच्या एकूण साठ्याच्या ५ टक्के आहे. याशिवाय कझाकस्तान आणि जॉर्डनच्या मध्यवर्ती बँकांनीही त्यांच्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली. जगभरातील मध्यवर्ती बँकांनी केलेल्या या सोन्याच्या खरेदीत जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोने हा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्याचे दिसून येते. भारतासारख्या देशांकडून सातत्याने होत असलेली सोन्याची खरेदी हे आर्थिक स्थैर्याच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल मानले जात आहे.