नांदेड : प्रतिनिधी
विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागातील एसी गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळताच तातडीने प्रत्यक्ष रुग्णालयात उपस्थित राहून आमदार आनंदराव बोंढारकर यांनी पाहणी केली. यावेळी वेैद्यकीय अधिका-यांना सक्त सूचना देत, रुग्णांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा दिला.
आयसीयु विभागात नवजात बालकांवर उपचार सुरू असताना तापमान नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र येथील एसी बंद असल्याने उकाड्याचा त्रास होत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त झाली. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित वैद्यकीय अधिका-यांना चांगलेच धारेवर धरत तातडीने एसी दुरुस्त करून कार्यान्वित करण्याचे आदेश दिले.
यासोबतच रुग्णालयातील स्वच्छतागृहांची अस्वच्छता आणि बेडशीटची अस्वच्छ अवस्था निदर्शनास आली. रुग्णालयात उपचारासाठी येणा-या रुग्णांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित अधिका-्यांना याबाबतही कडक सूचना देत तातडीने स्वच्छता व्यवस्था सुधारण्याचे निर्देश दिले. रुग्णसेवेत हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता आणि उपचार व्यवस्था याबाबत यापुढेही नियमितपणे पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करून घेतल्या जातील, अशी ताकीदही आ. बोंढारकर यांनी दिली.
















