26.2 C
Latur
Tuesday, July 29, 2025
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस

रेणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात दमदार पाऊस

रेणापूर : प्रतिनिधी
रेणा मध्यम प्रकल्पच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत पाच टक्क्यांनी वाढ झाली असून धरणात सध्यस्थितीत २६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सध्या पाण्याचा येवा सुरू असून पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शनिवारी (दि.२६) दिवसभर सर्वत्र पाऊस पडल्याने या एकाच दिवसात तालुक्यातील ५ महसूल मंडळात २९४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
खरीपाच्या पेरणीनंतर तब्बल एक महिना पावसाने ओढ दिली होती त्यामुळे कोवळ्या पिकांवर दुष्काळाचे सावट पसरले होते. पावसाने उघाड दिल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. परंतु एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने १७ जुलैला हजेरी लावली. या दिवशी तालुक्यात ४४ मिमी पाऊस झाला. त्यांनंतर २२ जुलैला ४४.२ मिमी, २६ जुलैला ५८.४ मिमी आणि २७ जुलैला १५८.३ मिमी पाऊस पडला. आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात पाच टक्क्यांनी पाण्याची पातळी वाढली आहे तर रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळा व जवळगा या चार बॅरेजेसमध्ये पाणी आल्याने व पाण्याचा येवा सुरू असल्याने या चारही बॅरेजेसचे दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले आहेत. तालुक्यात शनिवारी सर्वदुर पाऊस पडला.
या एकाच दिवसात रेणापूर महसुल मंडळात ५२ मिमी, कारेपूर महसुल मंडळात ९४ मिमी, पोहरेगाव मंडळात २० मिमी, पानगाव महसुल मंडळात ९८ मिमी तर पळशी महसूल मंडळात ३० मिमी असा या पाच महसूल मंडळात एकूण २९४ मिमी पाऊस झाल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. मृग नक्षत्राच्या अगोदरच अवकाळी पाऊस झाला त्यामुळे रेणा नदीवरील बॅरेजेस पुर्ण क्षमतेने तुडुंब भरल्याने सतत तीन दिवसांपासून या तिनही बॅरेजेसमधुन रेणा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रेणा नदीवरील बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरून वाहण्याची बहुदा ही पहिलीच घटना आहे.
या वर्षी पावसाळा सुरू होऊन एक दिड महिना उलटला परंतु रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत मात्र वाढ होत नव्हती. उलट धरणातील पाण्याची पातळी घटत होती त्यामुळे धरणातील पाणीपातळी बाढेल की नाही अशी भिती व्यक्त केली जात होती परंतु शनिवारी रेणा धरण क्षेत्रात चांगला दमदार पाऊस पडला त्यामुळे एकाच दिवसात धरणाची पाणी पातळी ५ सेमिने वाढली असून सध्या धरणात पाण्याचा येवा सुरु असल्याचे शाखा  अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR