नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यंदा १ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत साडेसहा लाख कोटी रुपये विवाह वेदीवर खर्च होतील, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने वर्तविला आहे.
येत्या १४ डिसेंबरपर्यंत देशात ४६ लाख विवाह संपन्न होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे साडी ते सॅलॉन अशा सर्वच क्षेत्रांत मागणी दिसून येईल. प्रसिद्ध कपडे ब्रँडचे अध्यक्ष एस. एल. पोखर्णा म्हणाले, १ हजार ४९९ रुपयांच्या कुर्त्यापासून ८५ हजार रुपयांपर्यंतच्या शेरवानीला चांगली मागणी आहे.
आलिशान हॉटेलचे विक्रीप्रमुख शेहझाद अस्लम म्हणाले, गतवर्षी याच कालावधीत झालेल्या १५ विवाह सोहळ्यांतून ११ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा १८ सोहळ्यांतून १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. प्रतिविवाह ९० लाख रुपयांचा खर्च झाला आहे.
विवाह सोहळ्यातील १५ टक्के खर्च दागिन्यांवर होत असतो. यंदा सोन्याचे भाव वाढल्याने अनेक खरेदीदार १८ कॅरेट सोन्याकडे वळत आहेत. यंदा हि-याच्या दागिन्यांकडे खरेदीदारांचा कल दिसून येत असल्याचे सराफा व्यावसायिक अंकुर डागा आणि रमेश कल्याणरमन यांनी सांगितले. कपडे व्यावसायिक पलक शहा म्हणाल्या, महिलांचा नवीन डिझाईनच्या आणि पारंपरिक साड्या खरेदी करण्याकडे कल आहे. यंदा लग्नसराईतील विक्रीत १० ते १५ टक्के वाढीचा अंदाज आहे.
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, सण आणि विवाहाशी संलग्न उलाढाल १२ ते १४ लाख कोटी रुपयांवर जाईल. त्यात विवाहाचा वाटा साडेचार ते पाच लाख कोटी रुपये असेल. ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत अर्थगतीची वाढ विवाहाशी संबंधित खरेदीमुळे होईल, असे ‘एचडीएफसी’च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ साक्षी गुप्ता म्हणाल्या.

