33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रलसणाला भाववाढीचा तडका

लसणाला भाववाढीचा तडका

किरकोळ बाजारात प्रतिकिलो ३२० ते ४०० रुपयांना विक्री

पुणे : खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकाचे मोठे नुकसान झाले. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. पिकाचे नुकसान झाल्यामुळे दुस-या पिकाची लागवड करण्यास वेळ लागला आहे. नवीन लसूण पिकाची आवक होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे भाव वाढत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

मध्य प्रदेशात लसणाची सर्वाधिक लागवड केली जाते. मात्र, खराब हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतात सुमारे ३२.७ लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात त्याचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. मात्र, चीनमध्ये उत्पादनात घट होऊनही ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

चीनमध्ये दरवर्षी सुमारे २ ते २५ दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते. दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो. सध्या लसणाने सामान्यांना घाम फोडला आहे. ठोक बाजारात लसूण प्रतिकिलो २५० ते ३०० आणि किरकोळ ३२० ते ४०० रुपये दराने विकला जात आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दरामुळे लसणाचा तडका देणे टाळले जात आहे.

यासंदर्भात अधिक सांगताना महात्मा फुले फळ आणि भाजीपाला अडते संघटनेचे सचिव राम महाजन म्हणाले, ‘पावसामुळे यंदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामत: लसणाचा तुटवडा सर्वत्र आहे. त्याचा फटका दरवाढीच्या स्वरूपात ग्राहकांना बसत आहे. सध्या आवक रोडावली आहे. ऐन लग्नसराईतील ही दरवाढ ग्राहकांसाठी डोकेदुखी असून अजून काही दिवस दर कमी होणार नाहीत, हे निश्चित आहे.’

नवीन पिकाची प्रतीक्षा
लसणाचे नवीन पीक साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात येणार आहे. नवीन पीक आल्यानंतर लसणाचे दर काही प्रमाणात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR