अय्यूब कादरी
धाराशिव: केंद्र, राज्य सरकारचा फोकस धार्मिक अजेंड्यावर आहे. धार्मिक प्रश्नांवर प्रचंड आक्रमक होणारी ही सरकारे लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांकडे फारसे गांभीर्याने पाहात नाहीत किंवा त्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष तरी वळवतात. गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात, राज्यात झालेल्या घटना पाहिल्या की हे सहजरित्या लक्षात येईल. राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या विजयाच्या जल्लोषात सत्ताधा-यांनी ते प्रश्न बाजूला टाकण्यात यश मिळवले. आता नीटचा पेपर लीक झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. जेनझीला संकटात ढकलण्यास जबाबदार कोण, असा प्रश्न समाजाला पडत असेल का?
अत्याचार, खून, बलात्कार… अशा अनेक घटना गेल्या महिन्यात राज्यात घडल्या. त्यामुळे समाजमन हादरून गेले. विशेषत: नसरापूर प्रकरणाने अंगावर शहारे आले. संवेदनशील मनाचे नागरिक अस्वस्थ झाले. हिंदू-मुस्लिम करणारे नेते, संघटना तितक्या आक्रमक झाल्याचे दिसले नाही. त्यातच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मोठा विजय मिळाला. याच्या जल्लोषात महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारीचे गंभीर प्रकार लोक विसरून गेले किंवा त्यांना ते विसरायला भाग पाडण्यात आले. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार असते आणि अशा घटना घडल्या असत्या तर..!
देशभरात या महिन्यात तीन तारखेला नीटची परीक्षा झाली. हिंदू-मुस्लिम अजेंडा चालवणारे, प्रत्येक समस्येसाठी काँग्रेसला जबाबदार धरणारे यावेळीही शांत राहिले. वैद्यकीय व्यवसायात कारकीर्द करण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-या देशभरातील जवळपास २३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला तरी सगळे कसे चिडीचूप… नीट पेपरफुटीचे मास्टरमाइंड महाराष्ट्रातील असल्याचे उघडकीस आले आहे. आता याची जबाबदारी कुणाची, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयÞशी ठरले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
दिल्ली, राजस्थान आणि गोवा येथील तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आलेल्या तणावातून, नैराश्यातून या विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. नीट परीक्षेसाठी विद्यार्थी दोन दोन वर्षे तयारी करतात. विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचीही ही परीक्षाच असते. पेपरफुटीमुळे नीटची परीक्षा रद्द झाली आणि लाखो विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला, याला कोण जबाबदार? विद्यार्थी आणि देशाच्या भवितव्याशी संबंधित एक परीक्षा व्यवस्थित घेऊ न शकणारे सरकार काय कामाचे, असा प्रश्न लोकांना पडत असेल की नाही?
…तरीही यंत्रणा गाफील कशी ?
नीटचा पेपर कुणामुळे फुटला, यासाठी विद्यार्थी जबाबदार नाहीत, तरीही त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. एका अर्थाने न केलेल्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे. नीटसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर फुटतोच कसा, त्यात इतकी ढिलाई कशी केली जाते, असे प्रश्न आहेत. काही वर्षांपूर्वीही नीटचा पेपर फुटला होता. तरीही सरकार, संबंधित यंत्रंणा गाफील राहिल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळच म्हणावा लागेल.
















