19.5 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeलातूरलाडक्या बहिणींनी निराधारांचे अनुदान रोखले!

लाडक्या बहिणींनी निराधारांचे अनुदान रोखले!

लातूर : एजाज शेख
राज्य शासनाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणली.  पात्र, अपात्रतेचा कसलाही निकष न लावता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावर १५०० रुपये वर्ग करण्यात आले. त्याचा अभूतपुर्व लाभही सत्ताधा-यांना मिळाला. मात्र बहिणींचे लाड पुरवण्यातच राज्य सरकारची तिजोरी रिकामी होत असल्याने इतर योजनांना पैसाच शिल्लक राहात नाही. त्याचा परिणाम संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेवर झाला असून गेल्या चार महिन्यांपासून लातूर शहर व ग्रामीणमधील १३ हजार ७७२ निराधारांना अनुदानच मिळाले नाही. त्यामुळे या निराधारांवर उपासमारिची वेळ आली आहे.
लातूर शहरात संजय गांधी निराधार योजना सर्वसाधारणचे ५ हजार ७६३, संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती १ हजार ८, संजय गांधी निराधार अनुसूचित जमाती ५३, लातूर ग्रामीणमध्ये संजय गांधी योजना सर्वसाधारणचे ४ हजार ८६३, संजय गांधी निराधार योजना अनुसूचित जाती १ हजार १८५ असे एकुण १३ हजार ७७२ लाभार्थी आहेत.
या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ नंतर अद्यापपर्यंत म्हणजेच गेल्या चार महिन्यांत अनुदान मिळालेले नाही. लातूर शहरातीलच श्रावण बाळ योजना सर्वसाधारणचे १० हजार ३६३, श्रावण बाळ योजना अनुसूचित जाती २७२२ आणि अनुसूचित जमाती १, असे एकुण १३ हजार ८६ लाभार्थ्यांना डिसेंबरपासून अनुदान मिळालेले नाही. तर लातूर ग्रामीणमधील श्रावणबाळ योजना सर्वसाधारणचे २२९२, श्रावणबाळ योजना अनुसूचित जातीचे ३ हजार ८२, असे एकुण ५ हजार ३७४ लाभार्थ्यांना सप्टेंबरनंतर अनुदान मिळालेले नाही.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारा लाभ वेळेवर मिळत नाही. त्यामुळे या योजनेतील  लाभार्थ्यांना लाभ मिळविण्याकरीताही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.  पोस्ट कार्यालय, तहसील कार्यालय, बँकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. या योजनेतील वृद्ध लाभार्थ्यांची हेळसांड होत आहे. असंख्य लाभार्थी हे या अनुदानावरच जीवन जगत असतात. परंतू, लाडकी बहीण योजनेवर खुप मोठा खर्च झाल्याने राज्य शासनाने सध्या तरी या वृद्ध लाभार्थ्यांना वा-यावर सोडल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR