मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांचे कौल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळाली.
महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची लाट असल्याचे निवडणुकीच्या मतमोजणीवरून स्पष्ट झाले आहे. महायुती रेकॉर्डब्रेक बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. महायुतीला मिळणारं यश आणि समोर येणा-या महायुतीच्या आकड्यांवरून लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वीच सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये अडीच कोटी महिलांच्या खात्यात टाकले. सरकारचा प्रचार लाडक्या बहिणीवरच केंद्रीत झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. त्यामुळे महिला मतदारांनी महायुतीला आपला कौल दिल्याचे दिसते.