लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याचा सुपुत्र डॉ. अमर साहेबराव घार यांनी भारतात पहिल्यांदाच स्वदेशी फेमटोसेकंड लेझर तंत्रज्ञान विकसित करून मोठे यश मिळवले आहे. आयआयटी कानपूर सारख्या भारतातील आघाडीच्या संशोधन संस्थेत ते संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. अमर घार यांनी एम.एससी. फिजिक्स स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथुन स्वर्णपदकासह पूर्ण केले. तसेच, त्यांनी देवी अहिल्या विद्यापीठ (डीएव्हीव्ही) आणि आरआरसीएटी, इंदूर येथून लेझर तंत्रज्ञानातपण पदव्युत्तर शिक्षणामध्ये स्वर्णपदक मिळवले आहे. पुढे त्यांनी आयआयटी कानपूर येथून लेझर तंत्रज्ञानात पीएचडी पूर्ण केली.
आजपर्यंत भारतात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी फेमटोसेकंड लेझर प्रणाली संपूर्णपणे आयात केली जात होती, ज्यामुळे त्याचा खर्च खूप जास्त होता. मात्र, डॉ. अमर घार आणि त्यांच्या संशोधन टीमने ही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत पूर्णत: स्वदेशी प्रणाली विकसित केली आहे, जी ३०-५०% कमी खर्चात उपलब्ध होईल.
डॉ. अमर घार आणि त्यांची टीम यांनी हि अत्याधुनिक फेमटोसेकंड लेझर प्रणाली ( आयएमटीई २०२५) अंतराषष्टिय प्रदर्शनात सादर केली आहे. ही प्रणाली मायक्रोमशिनिंग, बायोमेडिकल उपकरणे, सेमीकंडक्टर प्रक्रिया, आणि ऑप्टिकल फायबर उत्पादनात मोठी क्रांती घडवू शकते.
डॉ. अमर घार आणि त्यांचे बंधू किशोर घार, मनोज घार, श्रीकांत घार हे एकत्र येऊन लातूर येथे कृषी अवशेषांपासून आणि नेपियर गवतावर आधारित इनबिल्ट बायोगॅस प्लांटच्या निर्मितीवर काम करत आहेत. या प्रकल्पात जगातील अत्याधुनिक आणि नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान हरित ऊर्जा निर्मितीला चालना देईल आणि भारतातील बायोगॅस
उद्योगाला नवीन दिशा देईल असा विश्वास त्याना आहे.
डॉ. अमर घार हे स्व. साहेबराव घार यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी हे संपूर्ण यश आपल्या दिवंगत वडिलांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला समर्पित केले आहे. आपल्या वडिलांच्या प्रेरणेने ते आज या टप्प्यावर पोहोचल्याचे ते अभिमानाने सांगतात. डॉ. अमर घार यांच्या या यशामुळे लातूर जिल्ह्यासह संपूर्ण समाजातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या यशाने लातूर जिल्ह्यातील नवोदित संशोधक आणि उद्योजकांसाठी प्रेरणा मिळेल. विज्ञान, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-या तरुणांसाठी डॉ. अमर घार यांची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी आहे.