21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरलातूरमधील पेपर लीक प्रकरणातील खरा सूत्रधार कोण?

लातूरमधील पेपर लीक प्रकरणातील खरा सूत्रधार कोण?

दोन गंगाधरांचे हात वर, संजय जाधव व जलीलखॉं पठाणकडून तपास यंत्रणेची दिशाभूल!

विनोद उगिले
लातूर : प्रतिनिधी
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या लातूर येथील नीट पेपर लीक प्रकरणातील गुन्ह्याचा तपास करणा-या नांदेड एटीएस, लातूर पोलिस व सीबीआय या तपास यंत्रणेची संशयित आरोपी संजय जाधव व जलीलखॉं पठाण यांनी दिशाभूल केली असून त्यांनी बोट दाखवलेल्या दोन्ही गंगाधरांनी तो मी नव्हेच असे म्हणत हातवर केल्याने सीबीआयपुढे आता नवा पेच निर्माण झाला आहे. आता या गुन्ह्यातील खरा सूत्रधार कोण, हा प्रश्न पडला असून, लातुरातील फरार ईरन्ना मसनाजी कोनगुलवार याच्या अटकेनंतरच या गुन्ह्याच्या तपासाला खरी दिशा मिळू शकते, अशी चर्चा आहे.

लातुरातील नीट पेपर लीक प्रकरणात नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने दि. २२ जून रोजी संशयितांची चौकशी करून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी नांदेडच्या दहशतवादविरोधी पथकाला संशयितांची चौकशी करताना दिल्लीचा गंगाधर नामक व्यक्ती संजय तुकाराम जाधवच्या संपर्कात असल्याचे समोर आले. संजय जाधवच्या मोबाईलमध्ये गंगाधर दिल्ली या नावाने नंबरही सेव्ह होता. यावरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपीबरोबरच दिल्लीचा गंगाधर (मो. नं. ९९११३३०१६५) याचाही उल्लेख केला होता.

त्यानंतर लातूर पोलिसांनी या गुन्ह्यातील पोलिस कोठडीत असलेल्या संजय जाधव व जलीलखॉं पठाण यांच्या सांगण्यावरून पथके पाठवून गंगाधरचा शोध घेतला होता. दरम्यान सीबीआयने डेहराडून येथून एफआयआरमध्ये नोंदवलेल्या मोबाईलधारक गंगाधरला ताब्यात घेतले. त्याचे नाव गंगाधर गुंड असून, त्याला सीबीआय कोठडी मिळाल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. त्यातच लातुरात आलेल्या सीबीआय पथकाला सीबीआय कोठडीत असलेल्या संजय जाधव व जलीलखॉं पठाण यांनी बंगळुरूतील एन. गंगाधरप्पा नानजुडप्पा याच्याकडे बोट दाखवले. त्यालाही अटक करून लातुरात आणले. त्याच्या चौकशीऐवजी उपचारातच सीबीआय पथक बेजार झाले.

दरम्यान, त्याच्या चौकशीत मोबाईलमध्ये कोडवर्डवर सेव्ह केलेले नंबर व मेसेज मिळाले. परंतु यावरून अजूनही गुन्ह्याशी संबंधित धागेदोरे जुळून आले नाहीत, असे समजते. अर्थात, एन. गंगाधरप्पानेही तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली आहे. त्यातच डेहराडून येथील गंगाधर गुंड या संशयिताला २५ हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. यावरून अटकेतील संशयित आरोपी संजय जाधव व जलीलखॉं पठाण तपास यंत्रणांची दिशाभूल तर करीत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे फरार ईरन्नाच्या अटकेनंतरच तपासाला खरी दिशा मिळेल, असे बोलले जात आहे.

ईरन्नाच्या अटकपुर्व
जामिनावर आज सुनावणी
नीट पेपर लीक प्रकरणातील फरार ईरन्ना कोनगुलवार याने वकिला मार्फत लातूरच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान सीबीआयने ईरन्ना कोनगुलवार याला जामीन मंजूर करु नये व त्याला तपासाकामी सीबीआयच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली. यावर गुरुवारी सुनावणी होणार असून न्यायालय काय निर्णय देणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीबीआयने दोन्ही गंगाधरच्या
मोबाईलचा सीडीआर मागवला
या गुन्ह्यातील सीबीआयकडून चौकशी करण्यात आलेल्या दोन्ही गंगाधरांच्या चौकशीतून सबळ अशी माहिती समोर आली नसली तरी सीबीआयने या दोन्ही गंगाधरांच्या मोबाईलचा सीडीआर डाटा मागवला असून तो प्राप्त झाल्यास ते हे संशयित किती दिवसांपासून संपर्कात होते. किती वेळा त्यांच्या मोबाईलवरून इतर कोणांशी संभाषण झाले ते समोर येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR