लातूर : प्रतिनिधी
गुणवत्तेच्या आधारे लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे, अशी मागणी महसुल आयुक्त कार्यालय कृती समितीच्या वतीने करण्यात आली असून त्याकरीता दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत लक्षवेधी धरणे आंदोलनही करण्यात येणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून मराठवाड्यात दुसरे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड येथे आयुक्तालय स्थापणार, असे मान्य केल्यामुळे लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. शरद इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत गुणवत्तेच्या आधारे लातूर येथेच मराठवाड्यातील दुसरे स्वतंत्र विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन झाले पाहिजे. लातूरकरांनी गेली पंधरा वर्षांपासून आयुक्त कार्यालयासाठी संघर्ष केला आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड परिसरातील नागरिकांचा तीव्र भावना विचारात घेऊन तत्कालीन तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासाठी योग्य ठिकाण कोणते याबाबत उमाकांत दांगट यांची समिती नेमली. या समितीने शासनाकडे अहवाल दिलेला असून तो अहवाल खुला करावा. या अहवालात गुणवत्तेच्या आधारावर लातूर येथे आयुक्त कार्यालयासाठी सकारात्मक शिफारस करण्यात आली आहे.
लातूरच्या जनतेची तीव्र भावना आणि आतापर्यंतचा इतिहास याचे अवलोकन न करता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडतात बैठकीत उमटले. लातूर येथेच विभागीय महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या बैठकीत अॅड.अण्णाराव पाटील, अॅड. व्यंकट बेंद्रे, अॅड. बळवंत जाधव, समितीचे निमंत्रक अॅड. उदय गवारे यांनी विचार मांडले.
या बैठकीस प्रामुख्याने अॅड. मधुकर राजमाने, अॅड. चंद्रकांत आगरकर, अॅड. प्रदीपसिंह गंगणे, अॅड. विजय जाधव, अॅड. कमलाकर सोनवणे, अॅड. मनीषा दिवे पाटील, अॅड. तृप्ती इटकरी, अॅड. नरेश कुलकर्णी, अॅड. बी. जी. कदम, अॅड.संजय पाटील, अॅड. गणेश यादव, अॅड. परवेज पठाण, अॅड. आनंद खांडेकर, अॅड. धनराज झाडके, अॅड. भालचंद्र कवठेकर, अॅड. रमेश गायकवाड, अॅड. शेखर हविले, अॅड. बी. व्ही. सूर्यवंशी, अॅड. बालाजी पांचाळ, अॅड. गुरुलिंग काळे, अॅड. भगवान साळुंखे, अॅड. प्रदीप पाटील, अॅड. अनंत बावणे, अॅड. सुभेदार मांदळे, अॅड. सोनवणे एस.डी., अॅड. हरी निटुरे, अॅड. राम पाटील आदी उपस्थित होते.