लातूर : प्रतिनिधी
फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. च्या वतीने लातूर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला आर्थिक वर्ष २०२२-२०२३ साठी १२६ ते २०० कोटी ठेवी या नामांकनासाठी याही वर्षी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लातूर मल्टीस्टेट संस्थेद्वारे ग्राहकांना दिल्या जाणा-या नवनवीन, अत्याधुनिक सेवा सुविधा यामुळे ग्राहक वर्गामध्ये संस्थेविषयी एक विश्वास निर्माण होत असून या विश्वासाचे फलित म्हणून संस्था यशाची नवनवीन शिखरे पदाक्रांत करत आहे. याच यशाच्या मार्गावरती आणखीन एक मानाचा तुरा या पुरस्कारामुळे होऊ लागला आहे. गेल्या ११ वर्षापासून लातूर मल्टीस्टेट आपल्या नवनवीन तसेच ग्राहकाभिमुख सेवाद्वारे लातूर तसेच परिसरातील सर्व सभासदांना व ग्रामीण भागातील ग्राहकांना सर्व प्रकारच्या उत्तम तसेच विश्वासार्ह अशा आर्थिक सेवा सुविधा पुरवत आहे.
सभासद, ठेवीदार यांचा विश्वास, योग्य नियोजन आणि संस्थेच्या प्रत्येक व्यक्तींचे परिश्रम यामुळेच आपल्या संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. असे संस्थेचे चेअरमन इसरार सगरे यांनी यावेळी सांगितले. सदर पुरस्काराचे वितरण दि. ८ व ९ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे न्यु. दिल्लीचे केंद्रीय निबंधकांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.