लातूर : प्रतिनिधी
आगामी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. काँग्रेस पक्षाकडे इच्छूक उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. केवळ आठ दिवसांत तब्बल ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागणी करीता पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. दि. २३ नोव्हेंबर हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु, कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून, पक्षाचे नेते माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुदतवाढ दिली असून, आता इच्छुकांना ३० नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागणीचे अर्ज सादर करता येणार आहेत.
विक्रमी ४०० हून अधिक अर्ज दाखल:
लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मागवण्याची मोहीम सुरू केली होती. शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, २३ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ४०० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. अॅड. किरण जाधव यांनी सांगितले की, हा प्रतिसाद पक्षासाठी अत्यंत उत्साहवर्धक असून, केवळ सक्रिय कार्यकर्तेच नव्हे, तर विविध समाज घटकांचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि प्रमुख व्यक्तींनीही उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारीसाठी असलेली ही उत्सुकता लातूरमध्ये काँग्रेसच्या वाढत्या ताकदीचे आणि जनमानसातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून मुदतवाढीला मंजुरी:
उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत रविवार, २३ नोव्हेंबर रोजी संपत होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात असलेल्या विवाह समारंभांमुळे (लग्नाच्या तारखा) तसेच अन्य व्यस्ततेमुळे अनेक इच्छुक वेळेत अर्ज सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मुदत वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने कार्यकर्त्यांच्या या मागणीसंदर्भात राज्याचे माजी मंत्री तथा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा केली. आमदार अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढीला त्वरित मंजुरी दिली आहे.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या मंजुरीनंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली: ४०० अर्ज दाखल होऊनही आणखी अनेक जण इच्छुक असल्याने, तसेच अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक होती. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशानुसार आता काँग्रेस भवन, लातूर येथे इच्छुकांना ३० नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी मागणी अर्ज सादर करता येणार आहेत. या मुदतवाढीमुळे लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची मागणी करणा-या इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक आठवड्याचा कालावधी मिळाला आहे.

