पुणे : एकीकडे उन्हाचा पारा ३५ अंशापर्यंत पोहोचल्याने अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे लिंबू सरबत पिऊन जीव थंड करणेही अवघड बनले आहे. कारण दोन रुपयांना मिळणारे लिंबू बाजारात आता पाच ते दहा रुपयांना विकले जात आहे.
बाजारपेठेत लिंबाचे दर वाढले आहेत. लहान आकाराची लिंबं शेकडा ५०० तर मोठ्या आकाराची लिंबं शेकडा एक हजार रुपये अशा दराने विकली जात आहेत. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पंढरपूर, आंध्र प्रदेश येथून लिंबाची आवक होत असते. मात्र येथून आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत.
उन्हाळ्यात लिंबांना मोठी मागणी असते. गारपीट व अवकाळी पावसामुळे लिंबाच्या बागांना मोठा फटका बसला असून, आवक कमी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तीच-चार महिन्यांपूर्वी बाजारात लहान आकाराची पाच रुपयांना पाच लिंबं मिळत होते. मात्र आता पाच रुपयांत एकच लिंबू मिळत आहे.
बाजारपेठेमध्ये सर्वांत लहान आकाराची लिंबं ५०० रुपये शेकडो, मध्यम आकाराची ६५०, ८००, ९०० तर सर्वांत मोठ्या आकाराच्या लिंबाचा शेकडा दर एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
शेतकरी बंधूंनी लिंबाची काढणी करताना अपरिपक्व लिंबाची काढणी करू नये, ब-याचदा बाजारभाव चांगले मिळतात त्यामुळे लिंबं लवकर काढली जातात. लिंबाचे दर आकारानुसार ठरले जातात. त्यामुळे योग्यवेळी काढणी करणे जरुरीचे आहे.