लॉस एंजेलिस : वृत्तसंस्था
हिंसक निदर्शने, जाळपोळ आणि लुटमारीच्या घटनेनंतर मंगळवारी रात्रीपासून लॉस एंजेलिसमध्ये आंशिक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरात पुढील काही दिवस रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल, असे लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांनी स्पष्ट केले आहे.
हिंसाचाराच्या घटनानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले. एका अंदाजानुसार, देशातील या दुस-या सर्वात मोठ्या शहरात नॅशनल गार्ड आणि मरीनसह सुमारे ७००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. शहरात सैन्य तैनात करणे हा लोकशाहीवर हल्ला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे लष्करी सापळा रचत आहेत, असा आरोप कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी केला आहे.
कॅलिफोर्नियाचे राज्यपाल म्हणाले की, त्यांच्या संमतीशिवाय किंवा पाठिंब्याशिवाय कॅलिफोर्नियामध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याचा ट्रम्पचा निर्णय इतर राज्यांना इशारा देण्यासारखा आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कृती इथेच संपणार नाहीत, असा इशाराही न्यूसम यांनी दिला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी न्यायालयातही धाव घेतली आहे. दरम्यान, संचारबंदी लागू केलेल्या परिसरात निदर्शने करण्यासाठी उतरलेल्या लोकांची धरपकड करण्यात येत आहे. बेकायदेशीर सभेच्या ठिकाणी अनेकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती लॉस एंजेलिस पोलिसांनी दिली आहे.