लातूर : प्रतिनिधी
लातूरचे भूमिपुत्र असलेले डॉ. शिवाजी काळगे यांना काँग्रेस पक्षाने लातूर लोकसभेसाठी उमेदवारी दिली, त्या क्षणापासून लातूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये दिसून येणारा उत्साह, स्वागत, कौतुक हीच काँग्रेसच्या विजयाची नांदी आहे. आता लातूरचे खासदार हे काँग्रेसचेच असतील, असा विश्वास ‘लातूर ग्रामीण’चे आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. १ एप्रिल रोजी व्यक्त्त केला.
लातूर_ ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील पळशी, कामखेडा, डिघोळ देशमुख, दर्जी बोरगाव येथे पंचायत समिती सर्कलमधील विविध गावांतील महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांची, कार्यकर्त्यांची काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आमदार धिरज देशमुख म्हणाले, आपला परिसर काँग्रेस पक्षाच्या विचारांनी चालणारा आहे. त्यामुळे आपल्या विचाराचा प्रतिनिधी आपण संसदेत पाठवावा. मागील काळात भाजपच्या फसव्या घोषणांना अनेक मतदार बळी पडले. गेल्या १० वर्षांत त्यांनी नुसती आश्वासने दिली. अंमलबजावणी केली नाही. बोलणे आणि वागणे यात तफावत असणा-या, जनतेची दिशाभूल करणा-या भाजपला आपण हद्दपार करावे. आता त्यांच्या फसव्या घोषणांना भुलून न जाता काँग्रेसचा प्रतिनिधी आपण संसदेत पाठवावा.
आपल्या प्रत्येकाचा आवाज बुलंद करण्यासाठी डॉ. काळगे हे बहुमताने विजयी झाले पाहिजेत. यासाठी उत्साह कायम टिकवून गावागावांत प्रचार यंत्रणा अधिक सक्षमपणे राबवावी. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना सोबत घेवून पक्षाचे कार्य, पक्षाचा विचार, जाहिरनामा जनतेपर्यंत घेऊन जावे, असे आवाहनही आमदार धिरज देशमुख यांनी केले. डॉ. शिवाजी काळगे म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाने मला उमेदवारी दिली. मी शेतक-याचा मुलगा आहे. शेतक-यांचे प्रश्न मला माहीत आहेत. सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, तरुणांचे, उद्योजकांचे प्रश्न मला माहिती आहेत. ते सोडवत लातूरच्या परंपरेला साजेशी कामगिरी प्रामाणिकपणे करीन, असा शब्द देतो.
माजी आमदार त्र्यंबक भिसे, यशवंतराव पाटील, अनंतराव देशमुख, अनुप शेळके, किरण जाधव, राष्ट्रवादीचे रेणापूर तालुकाध्यक्ष रुपेश चक्रे, संभाजी रेड्डी, लालासाहेब चव्हाण, प्रमोद जाधव, शेषराव हाके, स्वाती सोमाणी, माणिक सोमवंशी, रमेश सूर्यवंशी, इम्रान सय्यद, बाळकृष्ण माने, संग्राम माटेकर, प्रकाश सूर्यवंशी, आशादुल्ला सय्यद, स्रेहल देशमुख, उद्धव चेपट, हणमंत पवार, राजकुमार पाटील, दशरथ जाधव, रामदास स्वामी, गुणवंत भंडारे, दीपक जगदाळे, अजिंक्य कदम, विठ्ठलराव देशमुख, शिरीष यादव आदीसह पळशी, कामखेडा, डिघोळ देशमुख, दर्जी बोरगाव पंचायत समिती गणातील विविध गावांतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.