पूर्णा : स्वत:च्या प्लॉटवरील झाडे तोडण्यास विरोध करणा-या ६५ वर्षीय पित्याच्या डोक्यात मुलानेच लोखंडी सब्बल घालून गंभीर जखमी केल्याची घटना दि.२२ जानेवारी रोजी रात्री घडली होती. दरम्यान जखमी पित्याचा रुग्णालयात उपचारा दरम्यान दि.२४ रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चुडवा पोलीसांत मुलाच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा फरार झाला आहे.
पूर्णा तालुक्यातील नवी आबादी कलमुला येथील शेख आमीन शेख पीर अहेमद साहब (वय ६५) यांचा मुलगा शेख अकबर शेख आमीन हा नवी आबादी येथील प्लॉट नावाने करून दे म्हणून नेहमी भांडण करत होता. दि.२२ जानेवारी रोजी सदरील प्लॉटवर लावलेली झाडे मुलगा तोडत होता. यावेळी वडील शेख अमीन साब यांनी विरोध केला. त्यामुळे झाडे तोडण्याच्या शुल्लक कारणावरून बाप- लेकात कुरबुर झाली. यातच त्याठिकाणी असलेल्या लोखंडी सब्बलने शेख अकबर याने शेख अमीन साब यांच्या डोक्यात एका पाठोपाठ एक घाव घातले. यात शेख अमिन हे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी अकबर याने नातेवाईक व फिर्यादी शेख अफसर यांना तुम हमारे झगडो मे मत गिरो नही तो तुमको भी मारता असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर नातेवाईकांनी अमिन साब यांना गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू दि. २४ जानेवारी रोजी सकाळी त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली.
याप्रकरणी मयताचे नातेवाईक शेख अफसर शेख रशीद यांचे फियार्दीवरून नांदेड पोलिसांकडून मिळालेल्या एम.एल.सी आधारावरुन चुडावा पोलीस ठाण्यात शेख अकबर शेख आमीन रा. नवी आबादी कलमुला याचे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नरसिंह पोमनाळकर हे करत आहेत.