ज्येष्ठ नेत्याने दिले संकेत, वाटाघाटीत विलंब नको
मुंबई : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी सोबतच्या वाटाघाटींत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा महत्वाचा एक महिना निघून गेला. शेवटी वंचितकडून स्पष्ट अशी कुठलीच मागणी झाली नाही. परंतु मविआचा वेळ वाया गेला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत चर्चाही करायची नाही, अशी भूमिका मविआने घेतली आहे. वंचितने कुठलाही प्रस्ताव ठेवला तरीही त्याचा विचार करण्यात येणार नाही, असे आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतर्फे सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले. अनेक अटी-शर्थी ठेवून अखेर वंचितचे नेते मविआच्या बैठकीत सहभागी झाले. परंतु संपूर्ण फेब्रुवारीचा महिना जागावाटपावरुन चर्चा करण्यातच गेला. त्यातही वंचितकडून नेमक्या किती जागा हव्या, याचा थांगपत्ता मविआला लागू दिला नाही.
वाटाघाटी सुरू असतानाच वंचितने आपण २७ जागांवर चाचपणी करत असल्याचेही जाहीर केले तर अखेर आपल्याला सन्मानजनक वागणूक देत नसल्याचे सांगत वंचितने एक-एक करत राज्यात ३६ हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असून मविआने या निवडणुका एकत्रितच लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
चर्चेत खूप वेळ गेला
वंचितसाठी मविआची दारे बंद असल्याचे मविआतील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. वंचितने वाटाघाटी दरम्यान तब्बल एक महिना आम्हाला गुंतवून ठेवले. त्यांच्या मागण्या अतिशय अवास्तव होत्या, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे काही उमेदवारांना तयारीसाठी वेळही कमी मिळाला तर काही ठिकाणी उमेदवारांची निवड चुकल्याने त्या जागा गमवाव्या लागल्या, असेही या नेत्याने स्पष्ट केले.