महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. ते मध्यम आकाराच्या खासगी विमानाने, लिअरजेट-४५ ने प्रवास करत होते. त्यामुळे आता लहान खासगी विमाने जास्त प्राणघातक असतात का असा प्रश्न निर्माण होतो. बुधवारची सकाळ महाराष्ट्रासाठी एका मोठ्या धक्क्याने सुरू झाली. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. ते ज्या विमानातून प्रवास करत होते ते मध्यम आकाराचे चार्टर्ड खासगी विमान होते. लिअरजेट-४५ विमानाच्या अपघाताने केवळ राजकीय वर्तुळच हादरले नाही तर एक महत्त्वाचा विमान वाहतूक प्रश्नही उपस्थित झाला आहे. तो म्हणजे लहान खासगी विमाने मोठ्या विमानापेक्षा जास्त धोकादायक आहेत का? डीजीसीएच्या वरिष्ठ अधिका-यांनी या अपघाताची तांत्रिक चौकशी सुरू केली आहे.
लँडिंगच्या वेळी आघाताची दिशा, वेग, कोन आणि अपघातस्थळाची भौगोलिक परिस्थिती यांचे विश्लेषण तपास पथक करत आहे. विमान कोणत्या कोनात जमिनीवर आदळले हे समजून घेण्यासाठी संपूर्ण परिसराचे उच्च-रिझोल्युशन छायाचित्रण केले जात आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा आणि तांत्रिक विश्लेषणानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. खासगी जेट अपघात होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीमध्ये अचानक बिघाड होणे, लँडिंग दरम्यान पायलटला सेकंदात वेग, कोन आणि उंची संतुलित करावी लागते. इंजिनाच्या प्रतिसादात विलंब झाल्यास किंवा नियंत्रण प्रणालीमध्ये बिघाड झाल्यास परिस्थिती त्वरित नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. लिअरजेट-४५ सारख्या विमानामध्ये हे आव्हान अधिकच वाढते, कारण ही विमाने हलकी असतात आणि पायलटकडे चूक सुधारण्यासाठी मर्यादित वेळ असतो. नासा-एम्स रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार जगभरातील सुमारे ५० टक्के विमान अपघातांमध्ये पायलटची चूक हे एक प्रमुख कारण आहे. याचा अर्थ असा की, २ पैकी १ अपघात मानवी चुकीमुळे होतो.
जर लँडिंग दरम्यान वेग खूप जास्त असेल किंवा कोन चुकीचा असेल, तर पायलटने एक फेरी मारली पाहिजे. म्हणजेच त्याने पुन्हा उड्डाण करायला हवे. व्हीआयपी फ्लाईट्सवरील वेळेचा दबाव धोका वाढवतो. याचा अर्थ असा नव्हे की पायलट अनुभवी नाही. परिस्थिती कधीकधी इतक्या वेगाने बदलू शकते की चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. अजित पवार यांच्या विमानाचा कॅप्टन अनुभवी होता. विमान वाहतूक तज्ज्ञांच्या मते व्हीआयपी फ्लाईट्सवरील वेळेचा दबाव आणि वेळापत्रकातील अडचणी पायलटला अतिरिक्त जोखीम घेण्यास भाग पाडू शकतात. प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान लँडिंगपूर्वी सुमारे १०० फूट उंचीवर होते आणि नंतर पुन्हा वर चढण्याच्या प्रयत्नात होते. म्हणजेच पायलटने शेवटच्या क्षणी विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. विमान अपघातासाठी धावपट्टी देखील जबाबदार असू शकते. कोणत्याही लँडिंगसाठी धावपट्टीची स्थिती महत्त्वाची असते. जर धावपट्टी ओली असेल तर अचूक वेग आणि कोनातही विमान घसरू शकते. लहान विमानतळांवर धावपट्टीची लांबी मर्यादित असते, आधुनिक सुरक्षा व्यवस्था नसते, त्यामुळे धोका वाढतो.
सुरुवातीच्या अहवालामध्ये असे सूचित करण्यात आले आहे की, विमान धावपट्टीवरून घसरले असावे. अर्थात याची पुष्टी तपासानंतरच स्पष्ट होईल. अजित पवारांच्या विमानाला दाट धुके, कमी दृश्यमानतेमुळे अपघात झाला असावा असा अंदाज आहे. दाट धुके, कमी दृश्यमानता आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अपघाताच्या वेळी बारामती येथील धावपट्टीच्या परिसरात दाट धुके होते, ज्यामुळे दृश्यमानता केवळ ८०० मीटरपर्यंत आली होती. याच कमी दृश्यमानतेत विमान उतरवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे हा अपघात झाला असे सांगितले जात आहे. अजित पवारांच्या विमानाला जिथे अपघात झाला तो बारामतीजवळील शेतजमिनीचा भाग आहे. विमान जमिनीवर कोसळताच आग लागली. विमान धावपट्टी सोडून शेजारच्या भागात कोसळले. लँडिंग करताना विमानाचे नियंत्रण बिघडले होते.
लँडिंगचा प्रयत्न करताना विमान अडखळले आणि काही क्षणांतच ते अपघातग्रस्त झाले. कोसळल्यानंतर सुमारे पाच स्फोट झाले आणि विमानाला भीषण आग लागली. अपघातानंतर विमान पूर्णपणे जळून खाक झाले आणि त्यातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. अजित पवारांचे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोजुबावी परिसरात शेतात कोसळले. अपघात इतका जबरदस्त होता की विमानाचे तुकडे झाले आणि काही क्षणातच विमानाला भीषण आग लागली. बचाव पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अपघातग्रस्त भाग खोलगट असून आजूबाजूला झाडेझुडपे, उसाची शेती आणि काही घरे आहेत. चष्मा आणि घड्याळावरून अजितदादांची ओळख पटली. राजकीय जीवनात ‘घड्याळ’ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या आयुष्याची शेवटची ओळख पटवली.
हा नियतीचा अत्यंत क्रूर खेळ म्हणावा लागेल. देशाने यापूर्वीही अनेक राजकीय नेते, शास्त्रज्ञ, उद्योगपती, सेलिब्रिटी, ख्यातनाम व्यक्तींना विमान अपघातांमध्ये गमावले आहे. ख्यातनाम अणुभौतिक शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा, काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री माधवराव शिंदे, माजी लोकसभा अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी, मेघालयाचे माजी मंत्री सायप्रियन संगमा, दक्षिण भारतीय अभिनेत्री सौंदर्या, उद्योगपती आणि हरियाणाचे माजी मंत्री ओम प्रकाश जिंदाल, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू, भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आदींचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांचा मृत्यू अकाली आणि हा विमान अपघात ‘अनैसर्गिक’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका असे म्हटले आहे. या अपघातामागे कसलेही राजकारण नाही, कृपा करून यात राजकारण आणू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

