28.1 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमहाराष्ट्रवायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमसोबत का जोडला होता?;काँग्रेसचा सवाल

वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमसोबत का जोडला होता?;काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात लागलेला निकाल वादात सापडला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या खोलीत मोबाईलचा वापर केला होता. या प्रकरणावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यायला हवे असे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा केवळ ४८ मतांनी पराभव केला. मात्र या निकालाच्या मतमोजणी दरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप अमोल कीर्तिकर यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी केला आहे. अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे.

ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. एनडीएचा हा उमेदवार केवळ ४८ मतांनी विजयी झाला आहे. अशा परिस्थितीत प्रश्न आहेत. एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी मतमोजणी केंद्राच्या खोलीमध्ये परवानगी नसताना मोबाईल फोनचा वापर केला गेल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वनराई पोलिसांनी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाने मतमोजणीच्या वेळी ईव्हीएम अनलॉक करणा-या फोनचा वापर केल्याचे समोर आले आहे. पोलिस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले. पंडीलकर यांच्याकडे जो मोबाईल सापडला तो दिनेश गुरव यानेच त्यांना दिला होता. हा मोबाईल ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशिन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला होता. पोलिसांनी हा मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.

आता लोकशाहीसोबत गद्दारी – आदित्य ठाकरे
उत्तर-पश्चिम मुंबईतील मिंधे टोळीच्या उमेदवाराचे प्रकरण गंभीर बनले आहे, कारण गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संपूर्ण तडजोड करून निवडणूक आयोगाने मतमोजणी केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यास नकार दिला आहे. माझा अंदाज आहे की हा आणखी एक चंदिगडमधील गोंधळासारखा प्रसंग टाळण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही नेहमी म्हणतो की भाजप आणि मिंधे टोळीला आपली लोकशाही संपवायची आहे. त्यांना आताची घटना बदलायची आहे. हा गैरप्रकार हा त्यांच्या याच सततच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR