मुंबई : प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाच्या (३ जुलै) चौथ्या दिवशीही विरोधक आक्रमक पाहायला मिळाले. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक परंपरा मानली जाते. या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी काल विधानसभेत काही ‘अर्बन नक्षलवादी’ घटक वारक-यांच्या वेशात वारीत सहभागी होत असल्याचा दावा केला. मात्र राज्य सरकारमधील नेत्यांनी त्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे, असे म्हणत राज्य सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या पाय-यांवर विरोधकांनी आंदोलन केले.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहेत. सत्ताधारी वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला ‘अर्बन नक्षल’ म्हणून विठुरायाला आणि वारक-यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे आज विधान भवनाच्या पाय-यांवर सत्ताधा-यांच्या या अपमानकारक जुलूमशाहीविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी तिन्ही पक्षांतील आमदार आंदोलनात सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘शेतकरी उपाशी, मात्र मंत्री तुपाशी…’, ‘वारक-यांना अर्बन नक्षल म्हणणा-या सरकारचा धिक्कार असो…’, ‘भूखंड लाटणा-या सरकारचा धिक्कार असो…’, ‘वारीला बदनाम करणा-या सत्ताधा-यांचा धिक्कार असो..’, ‘भूखंडाचा श्रीखंड खाणा-या भ्रष्ट मंत्र्यांचा धिक्कार असो,’ अशा जोरदार घोषणा देत विरोधकांनी पाय-यांवर आंदोलन केले.
वारीमध्ये ‘अर्बन नक्षली’ शिरल्याचा दावा
२ जून रोजी शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये ‘अर्बन नक्षली’ शिरल्याचा दावा केला. पंढरपूर वारीमध्ये काही लोक असे घुसले आहेत, जे धर्माला किंवा देवाला मानत नाहीत. हे सगळे अर्बन नक्षलवादी आहेत, यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली. दरम्यान, मनीषा कायंदे यांच्या या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे आज पाहायला मिळाले.