23.2 C
Latur
Tuesday, November 19, 2024
Homeमहाराष्ट्रवाहनावर दगडफेक, अपक्ष उमेदवार गंभीर जखमी

वाहनावर दगडफेक, अपक्ष उमेदवार गंभीर जखमी

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
गंगापूर विधानसभा मतदारसंघांचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर वाळूजजवळील धामोरी शिवारात अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत सुरेश सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकारी लक्ष्मण डोळस हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (१८ नोव्हेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुरेश सोनवणे हे सोमवारी रात्री घरी परतत असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीस हात दाखवून गाडी थांबवली. त्यांना वाटलं की, ते कार्यकर्ते असावेत. त्यामुळे ते गाडीतून खाली उतरले. तेव्हा अचानक बाजूच्या शेतातून त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू झाली. त्यात सुरेश सोनवणे यांच्यासह त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले. तर त्यांच्यासोबत असलेले इतर कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. डोक्याला दुखापत झाल्याने सुरेश सोनवणे यांना तत्काळ सीएसएमएसएस या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी रुग्णालयात धाव घेत सुरेश सोनवणे यांची विचारपूस केली. हल्ला नेमका कुणी आणि का केला याचा पोलिस शोध घेत आहेत. तर डोणगावजवळही सोनवणे यांच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची माहिती सुरेश सोनवणे यांचे बंधू निलेश सोनवणे यांनी दिली आहे.

दगडफेक करून हल्लेखोर फरार : सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी सुरेश सोनवणे यांचे कारचालक सुरज ज्ञानेश्वर मुंडे यांच्या तक्रारीवरून पो. स्टे. वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR