26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरविकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघास देणार 

विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघास देणार 

अहमदपूर : प्रतिनिधी
विकास करीत असताना विकासाचा वाटा संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावा-गावापर्यंत आणि वाडी- तांड्यापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे बोलताना केले.
        अंधोरी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व  समाधान शिबीर कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उज्वलाताई पांगरकर, नूतन गटविकास अधिकारी पंकज शेळके, अंधोरीच्या सरपंच प्रफुल्लाताई ब्रिंगने, आर.एफ.ओ.शिल्पाताई गित्ते, उपअभियंता महावितरण राठोड पंडित, बालविकास अधिकारी राजेश गझलवाड, चेअरमन बापूराव सारोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी गणेश जाधव, तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे, सरपंच येलदरी विक्रम गुट्टे, राजपाल पाटील, सरपंच सुधीर गुट्टे, प्रफुल्ल गुंडरे, बाळू पाटील, नायब तहसीलदार अभिलाष जगताप, मुन्वर मुजावर, संजय भोसीकर, शुभांगी जवादे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.क्षीरसागर, स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले की, तालुक्यातील अनेक स्मशानभूमीचा प्रश्न सध्या आपण निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या मतदारसंघात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाल्याने मतदारसंघातून दळण वळणाची सुविधा निर्माण झाली आहे. तालुक्यात सर्व महिला अधिकारी असून त्यांचे कार्य उत्कृष्ट आहे. शेतक-यांना दिवसा वीज आता सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भेटणार आहे. शेतक-यांच्या मालाला भविष्यात अधिक दर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारने शेतक-यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक  रुग्णांना शासनाची मदत होत असते. अहमदपूर येथे अनेक प्रशासकीय इमारीतीचा प्रश्न सोडविला गेला आहे. आज वृक्ष लागवड आवश्यक आहे. आपण सर्वांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असेही मंत्री पाटील म्हणाले.
आज ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा कार्यक्रम होत आहे ही शाळा अत्यंत बोलकी असून गावातील इतर गुणवंतांचे कौतुकही पाटील यांनी केले. अंधोरी हे कबड्डीपटूचे गाव असून भविष्यात येथे कबड्डी स्टेडियम करणार असल्याचा शब्दही नामदार पाटील यांनी दिला. यावेळी तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने विविध विभागाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमध्ये  आधार कार्ड अपडेट करणे, मतदार ओळखपत्र देणे, महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले. तालुका अंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ, जल पुनर्भरन कार्यक्रम, संजय गांधी व वृद्धपकाळ योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शेतक-याच्या वारसांना सातबारा देण्यात आला.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार नायब तहसीलदार अभिलाष जगताप यांनी मानले. कार्यक्रमास अंधोरी गावातील नागरिकांची व महिलांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR