मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील विक्रोळी परिसरात एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरच्या स्फोटानंतर झोपडीला आग लागल्याने दोन जण आगीत होरपळले आहेत. दोघा जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धनंजय मिश्रा आणि राधेश्याम पांडे अशी जखमींची नावे आहेत.
विक्रोळीतील संजय नगरमधील श्रीराम सोसायटीमध्ये शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. स्फोट होताच शेजा-यांनी तात्काळ धाव घेत पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
अग्निशमन दलालाही आगीची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे कर्मचारी येईपर्यंत नागरिकांनी आग विझविली होती.