लातूर : प्रतिनिधी
कडक उन्हाळयाची तीव्रता वाढत असताना मंगळवारी सायंकाळी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जिल्हयात पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. नागरीकांना कडक उन्हाच्या झळा पासून होणारा त्रास कमी झाला. तर पावसाच्या सरीमुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेली पिके भिजल्याने शेतक-यांच्या पिकांचे मात्र नुकसान झाले.
जिल्हयात सध्या उन्हाचा पारा ३७ अंश सेल्सीअस च्या वर सरकताना दिसून येत आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उन्हाचे चटके दुपारी ४ वाजेपर्यत चागल्या प्रकारे जाणवू लागले आहेत. हवामान विभागाने रात्री ७.३० च्या नंतर पुढील ३-४ तासांत बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार लातूर जिल्हयात रात्री ७.३० नंतर विजाच्या कडकडाटासह जोरदार हवेच्या बरोबर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरीकांना होणा-या गर्मी पासून उसंत मिळाली. गार वातावरणामुळे नागरीकांना दिलासा मिळाला.