19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रविदर्भ तापला, अवकाळी पावसाचाही इशारा

विदर्भ तापला, अवकाळी पावसाचाही इशारा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यासह देशभरातील हवामानात मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यात तापमानाने नवा उच्चांक गाठला असताना आगामी काही दिवसात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या पा-याने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केला. आज विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४२.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्याखालोखाल यवतमाळमध्ये ४२ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील ३ दिवस विदर्भातील बहुतांश भागात ४० ते ५० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

विदर्भात एकीकडे उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असताना दुसरीकडे काही भागात पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. पुढील ४८ तासांत राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये विदर्भात उद्या ७ एप्रिल रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, गारपीट आणि पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही नागपूर हवामान विभागाने व्यक्त केला तर नागपूर, यवतमाळ, गोंदिया, अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ३०-४० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा अर्थात वादळीवारा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यासोबतच ८ एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे तर ९ एप्रिल रोजी विदर्भातील बुलढाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच उर्वरित गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम येथे ४० ते ५० किमी प्रतितास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ते विरळ पावसाचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

भंडा-यात विक्रमी
तापमानाची नोंद
हवामान विभागाने भंडारासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पुढील काही दिवस प्रखर उष्णता राहील, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, भंडा-यात या वर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. काल भंडा-यात ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच आज देखील जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे बघायला मिळाले. सकाळपासूनच प्रखर उष्णता पाहायला मिळाली. यामुळे दुपारी घरातून बाहेर पाडण्याचे अनेकांनी टाळले. परिणामी दुपारी शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहतूक पाहायला मिळाली.

मराठवाड्यातही
तापमान वाढले
एकीकडे विदर्भ तापलेला असताना मराठवाड्यातही अनेक ठिकाणी तापमानाने चाळीशी पार केली आहे. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे तर तापमान शुक्रवारी ४४ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले होते. हे राज्यातील उच्चांकी तापमान ठरले. शनिवारीही या भागात काही अंशी तापमान वाढले. यासोबतच सोलापूर, हिंगोली, परभणी, नांदेड आदी भागात तापमान वाढले आहे. त्यामुळे मराठवाडादेखील चांगलाच तापला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR