28.1 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघ अलर्ट!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रा.स्व. संघ अलर्ट!

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ४०० पारचा नारा दिला. परंतु एनडीएला ३०० पार करता आले नाही. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक फटका महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अन् पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बसला. महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर विचारमंथन राज्यातील भाजप नेत्यांनी सुरु केले आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रणनीती तयार केली जात आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अलर्ट मोडवर आला आहे. संघाकडून यासाठी मेगा प्लॅन तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदाराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलली आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर संघाकडून भाजपला सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावले जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय काढला. त्यानंतर अजित पवार यांनी सोबत घेतल्यासंदर्भात संघाकडून प्रश्न उपस्थित झाला. तसेच अहंकारी पक्षाला २४१ जागांवर रोखले, असे वक्तव्य संघाकडून झाले होते. त्यासंदर्भात विरोधकही आता भाजपला घेरत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची कार्यशाळा संघाकडून घेण्यात येणार आहे.

भाजपच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ विस्तार
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची चर्चा आहे. हा विस्तार करताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येणार आहे. भाजपमधून संधी देताना संघाचा सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहे. आता शेवटच्या टप्प्यात तरी मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR