सोलापूर : होटगी रोड विमानतळाची नई जिंदगी, नागनाथ नगर येथील जागा ताब्यात घेण्याची कारवाई एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू केली आहे. या कारवाईला विरोध करणारा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी फेटाळून लावला. या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे अर्जदारांचे वकील नीलेश ठोकडे यांनी सांगितले.
सोलापूर विमानतळाची ३५ एकर जागा विमानतळाच्या ताब्यात नव्हती.चार महिन्यांपूर्वी ही जागा ताब्यात आली. या जागेची बेकायदेशीर विक्री झाली असून, नागरिकांनी यावर घरे बांधल्याचे एअरपोर्ट अॅथॉरिटीचे म्हणणे आहे.
१५ दिवसांपूर्वी एअरपोर्ट अॅथॉरिटीने जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईला नागरिकांनी तीव्र विरोध केला. या विरोधात नागनाथ नगर येथील रहिवासी इरफान एरंडे व इतरांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.
या अर्जावर सुनावणी झाली. हा अर्ज फेटाळून लावला आहे. परंतु, या प्रकरणात जागा ताब्यात घेण्याचा मनाई हुकूम कायम आहे. उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याचे ठोकडे यांनी सांगितले.