26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्रविरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका

विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका

देवेंद्र फडणवीसांच्या आमदारांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी
आपल्यातल्या आपल्यात महायुतीत वाद होईल, अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका किंवा टीका करायला संधी देऊ नका अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील वादग्रस्त वक्तव्ये करणा-या आमदारांना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीसांकडून भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना पावसाळी अधिवेशनाच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमधील काही आमदार विविध मुद्यांवरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुतीच्या आमदारांना, ‘महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्ये टाळा’, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचसोबत भाजपमधील वादग्रस्त वक्तव्य करणा-या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. महायुतीच्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अधिवेशनात सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे. सर्व आमदारांनी अधिक सक्रिय व्हावे. आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून जनतेची कामे करावीत. सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे, अशा प्रकारच्या सूचना महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या. दरम्यान, गुरुवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत विरोधकांना म्हणावे तसे सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्यात विशेष यश मिळालेले नाही. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या आगामी दिवसांत विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

महायुती समन्वय समितीची बैठक
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे व हसन मुश्रीफ उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR