भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. लोकसभेसाठी मतदान सुरू असून चार जूनला त्याचा निकाल लागणार आहे. कोण निवडून येणार, कोण पराभूत होणार याबाबत चांदा ते बांदा अशी चर्चा रंगलेली असताना आता त्यात आणखी एका चर्चेची भर पडली आहे आणि ती म्हणजे टी-२० विश्वचषकाची. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ हा गेल्या चौदा वर्षांपासून विश्वचषकाच्या प्रतीक्षेत आहे. हा दुष्काळ यावर्षी तरी संपेल असे म्हणत म्हणत एक तपाहून अधिक काळ लोटला. आयपीएलमध्ये घाम घाळणारे खेळाडू विश्वचषकात कोणकोणत्या संघाला पाणी पाजतील, हा औत्सुक्याचा विषय आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात संयुक्तरीत्या टी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. या दोन्ही देशांतील एकूण ९ मैदानांवर या स्पर्धेचे एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. हा विश्वचषक अनेकार्थांनी वेगळा असणार आहे. कारण त्यात पात्रता फेरी खेळली जाणार नाही. सुपर-१२ टप्पाही होणार नाही. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तसेच पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना ९ जून रोजी होईल. या विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या १५ खेळाडूंची नावे जाहीर झाली असून अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माकडे कर्णधारपद तर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे.
भारतीय संघाने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. तसेच २००७ पासून भारताने टी-२०चा विश्वचषक जिंकलेला नाही. या पार्श्वभूमीवर यंदाचा विश्वचषक हा दुष्काळ संपविण्यासाठी भारतासाठी सुवर्णसंधी आहे. अर्थात गेल्या वर्षी भारताला आयसीसी जिंकण्याची दोनदा संधी मिळाली, मात्र दोन्ही वेळी अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. शिवाय भारतीय फलंदाजाकडून गेल्या तेरा वर्षांत एकही शतक झळकावले गेले नाही. ही उणीवही यंदा भरून निघावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. २ मे २०१० रोजीच्या सामन्यात सुरेश रैनाने शेवटचे शतक ठोकले. यात ६० चेंडूंत १०१ धावा तडकावल्या. यात नऊ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे धुरंधर फलंदाज आहेत आणि ते शतक ठोकण्याची क्षमता राखून आहेत. टी-२० च्या विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत ११ शतके झळकली आहेत. इंग्लंड, न्यूझिलंड, वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक दोन-दोन शतके नोंदली गेली आहेत,
त्याचवेळी भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याकडून प्रत्येकी एक शतक लगावले गेले. टी-२० मध्ये दोनदा शतक झळकवणारा ख्रिस गेल हा एकमेव खेळाडू आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या निमित्ताने आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय कामगिरीचा वेध घेणे औचित्याचे ठरेल. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेला टी-२० विश्वचषक भारतासाठी ऐतिहासिक ठरला. महेद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघाचा फलंदाज गौतम गंभीरने जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ५४ चेंडूत ७५ धावा तडकावल्या आणि मोठी धावसंख्या उभारली. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच धावांनी पराभूत करत भारताने विश्वचषकावर नाव कोरले होते. १९८३ नंतर भारताचे पहिले घवघवीत यश होते. हा विश्वचषक आणखी एका घटनेसाठी लक्षात राहिला, तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. तसेच डर्बन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आर. पी. सिंहने तेरा धावांत चार बळी टिपले होते. या विजयानंतर धोनीसेनेचे भारतात ‘न भूतो न भविष्यति’ असे स्वागत झाले होते.
२००९ च्या विश्वचषकात भारतीय संघाकडून खूप अपेक्षा होत्या. गतविजेता भारत यंदाही विश्वचषक राखेल, असे वाटत होते. मात्र वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांकडून सलग तीन पराभव स्वीकारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. तथापि, या स्पर्धेमध्ये मधल्या फळीचा फलंदाज युवराज सिंहची बॅट नेहमीप्रमाणे तळपली. त्याने स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक १५३ धावा काढल्या होत्या. प्रज्ञान ओझा हा सर्वाधिक बळी घेणारा ठरला होता. २०२२ मध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. मात्र या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा आणि अलेक्स हेल्सने ४७ चेंडूत ८६ धावा काढल्या आणि भारताच्या पदरी निराशा पडली.
मागच्या टी-२० विश्वचषकाची स्थिती पाहिली तर टीम इंडियातील खेळाडू दुखापतीने त्रस्त झाले होते. मोक्याच्या क्षणी जसप्रित बुमराह संघाबाहेर गेला आणि तो मोठा धक्का होता. विश्वचषकाच्या अगोदर खेळाडूंना विश्रांती देण्याची मागणी अनेकांनी केली. परंतु बीसीसीआयने खेळाडूंना विश्रांती न दिल्याने अनेक जण जायबंदी झाले. आताही तेच घडले आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम द्यावा, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे. रोहित शर्माला देखील काही काळ विश्रांती देणे गरजेचे होते, परंतु तसे घडले नाही. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच तरुणांवर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यासारखे अनुभवी तारे असून यशस्वी जयस्वाल, अर्शदीप सिंह, शिवम दुबे यासारखे यंगस्टर्स देखील आहेत. भारतीय संघात पाच फलंदाज, दोन यष्टीरक्षक, दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. या टीमद्वारे भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ संपावा, हीच तमाम क्रिकेटप्रेमी भारतीयांची इच्छा आहे.
– नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक