पुणे : प्रतिनिधी
कागदापासून सुरू झालेला व्यंगचित्रांचा प्रवास आता आयपॅड पर्यंत येऊन ठेपला असला तरी सृजनात्मक पातळीसाठी कागदावरच व्यक्त व्हावे लागते.सृजनाच्या पातळीवर मानवी क्षमता विलक्षण आहे. सहानुभूती आणि सहवेदना यासारख्या भावना कृत्रिम बुद्धीमत्तेत रूजवता येत नाहीत,असे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांनी सांगितले.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस मंगळवारी (२९ जुलै रोजी) वयाची शंभर वर्षे पूर्ण करीत आहेत यानिमित्त ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांच्याबरोबर पत्रकारांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी ते बोलत होते.
तंत्रज्ञानाला सहयोगी म्हणून वापरता येते,पण त्याच्यावर पूर्ण विसंबून राहता येत नाही.सुरुवातीला मुखपृष्ठकार म्हणून चित्रांकडे वळलो.शब्द विरहित चित्र हे बलस्थान ठरले. कालांतराने सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागलो आणि व्यंगचित्रकार म्हणून प्रवासाचा प्रारंभ झाला. व्यगंचित्रे राज्याच्या आणि देशाच्याही बाहेर स्वीकारली गेली.
याचाच अर्थ व्यंगचित्रांना कोणत्याही सीमा नसतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. व्यंगचित्रांमधून व्यक्त झालेला भाव समजून घेणे महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सहज सोपे होते. अलीकडे व्यंगचित्रांमधून व्यक्त होणे कठीण झाले असून एखादे व्यंगचित्र कसे स्वीकारतील याबाबत अंदाज बांधता येत नाही. एका मर्यादेनंतर व्यंगचित्रे माझ्यापुढे काय आव्हाने ठेवतील,असा प्रश्न पडायचा. मात्र सृजनाच्या पातळीवर व्यंगचित्र आजही आव्हान देते.मनाच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी कला आवश्यक आहे,असे ते म्हणाले.