मुंबई : शरद पवारांनी भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १९ऑक्टोबर १९६३ रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले.
लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले.
१९९९ साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि १२,००० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे.
सन २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.
शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी केला.
शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदेंविरोधात त्यांचा पराभव झाला होता. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषद आमदार आणि शरद पवार गटाचे मुख्य प्रतोद आहेत.