लातूर : प्रतिनिधी
वस्तू व सेवा कर चुकविणा-या लातूर शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिकांवर दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नांदेडच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन आस्थापनांना सील ठोकण्यात आले असून एका सुप्रसिद्ध हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली आहे. वस्तू व सेवा कर विभागाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील व्यापारी, व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लातूर शहर शैक्षणिक शहर म्हणून जसे सुप्रसिद्ध आहे तसेच व्यापारी शहर म्हणूनही नावलौकिक आहे. शहरातील व्यापारी बाजारपेठेत दररोज कोट्यवधींची उलाढाल असते. शांत, कायदा व सुव्यवस्था उत्तम असलेले शहर म्हणूनही लातूरची ओळख सर्वदूर आहे; परंतु व्यापारीपेठेत काही आर्थिक प्रकरणे घडली.
लातूरची उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठ पारदर्शक व्यवहारामुळे लातूर जिल्ह्यातच नव्हे तर शेजारील आंध ्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणातही सुप्रसिद्ध आहे. यामुळे या भागातूनही मोठ्या प्रमाण लातूरच्या आडत बाजारात शेतमालाची मोठी आवक असले; परंतु याच आठवड्यात आडत बाजारात आडते आणि खरेदीदारांमधील कोट्यवधी रुपयांच्या शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात आर्थिक पेच निर्माण झाला. ही बाब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यापर्यंत गेल्याने त्याची एकच चर्चा सुरू असताना शुक्रवारी अचानक वस्तू व सेवा कर विभागाने शहरात टाकलेल्या धाडींमुळे पुन्हा एकदा व्यापा-यांत आर्थिक चर्चेचे उधाण आले आहे.
नांदेडच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या पथकाने शुक्रवारी लातूर शहरातील प्रतिष्ठीत २ आस्थापनांवर धडक कारवाई केली. वस्तू व सेवा कर चुकविल्या कारणाने या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ६ तासांच्या चौकशीनंतर या २ आस्थापनांना या विभागाने सील ठोकले तसेच अल्पावधीतच नावारुपाला आलेल्या एका हॉटेलचीही चौकशी केली. धडक कारवाई करणा-या अधिका-यांशी संपर्क साधला असता त्या अधिका-यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. वस्तू व
सेवा कर विभागाच्या या धडक कारवाईमुळे लातूर शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.