मुंबई : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे स्मारक सातारा जिल्ह्यातील केडांबे या त्यांच्या मूळ गावी बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १३.४६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या मंजुरीनंतर, मंजूर झालेल्या २.७० कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला. २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना आपले प्राण अर्पण करणा-या तुकाराम ओंबळे यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हे स्मारक तुकाराम ओंबळे यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील केडांबे येथे बांधले जाईल. यासाठी १३.४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या मंजूर रकमेचा पहिला हप्ता, २.७० कोटी रुपये (२०%) शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही स्पष्ट केले आहे.
राजधानी मुंबईत रक्तरंजित खेळ
२६/११/२००८ हा काळा दिवस होता, जेव्हा पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला. त्यामध्ये एक भयंकर दहशतवादी अजमल कसाब होता, ज्याने रक्तपाताचा असा खेळ खेळला की संपूर्ण जग स्तब्ध झाले. कसाब हा एकमेव पाकिस्तानी दहशतवादी होता जो जिवंत पकडला गेला.