लातूर : प्रतिनिधी
उन्हाळयाची मोठी सुट्टी संपल्यानंतर शाळांची घंटा पुन्हा वाजली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले जाते, यासोबतच लातूर ग्रामीणमधील विद्यार्थ्यांना पुस्तकाची भेट मिळाली. ‘रीड लातूर’ उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवशी शाळांमध्ये रंगीबेरंगी गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याने चिमुरड्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मनोरंजक पुस्तके वाचायला मिळावीत, जेणेकरून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख आणि लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख हे नेहमीच आग्रही आणि प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी लातूर तालुक्यातील खंडाळा, नीलकंठ, गणेशनाथ, भिसेवाघोली आणि वाडीवघोली या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘रीड लातूर’ची खास पुस्तके वाचनासाठी भेट देण्यात आली असल्याची माहिती रीड लातूर उपक्रमाचे समन्वयक राजू सी. पाटील यांनी दिली आहे.
नेहमीच्या जड अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकांऐवजी पहिल्याच दिवशी हातामध्ये आकर्षक मुखपृष्ठ, सुंदर चित्रे आणि रंजक गोष्टी असलेली पुस्तके मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी वर्गात बसून अत्यंत आवडीने वाचन केले. ही पुस्तके मुलांना प्रचंड आवडली असून, त्यातील चित्रे आणि छोट्या-छोट्या गोष्टी ते एकमेकांना दाखवत आनंद घेत होते.
डिजिटल युगात मुलांमधील वाचनाची संस्कृती टिकून राहावी आणि ग्रामीण भागातील मुलांचा पाया मजबूत व्हावा, यासाठी रीड लातूर चा हा उपक्रम मैलाचा दगड ठरत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांमध्ये वाचनाचा उत्साह निर्माण केल्याबद्दल संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख व जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांचे मनापासून आभार मानले आहेत.
















