ग्राझ : ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका हायस्कूलमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला आणि २८ जण जखमी झाले. त्यापैकी किमान चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. काही जणांच्या डोक्यातही गोळ्या लागल्या आहेत.
पोलिसांनी परिसरात मोठी कारवाई सुरू केली आहे आणि लोकांना दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रियन मीडियाच्या वृत्तानुसार, सकाळी १० वाजता बोर्ग ड्रेयर्सचुत्झेंगासे हायस्कूलमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
यानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिस प्रवक्त्या साबरी योर्गुन यांनी सांगितले की, तिथे काय घडले हे शोधण्याचा पोलिस अजूनही प्रयत्न करत आहेत. सध्या घटनास्थळी स्पेशल फोर्स कोब्रा तैनात करण्यात आली आहे. संशयित हल्लेखोर कदाचित त्याच शाळेचा विद्यार्थी होता आणि त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. शाळेच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह आढळल्याचीही माहिती आहे.
ग्राझ हे ऑस्ट्रियातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे, जे देशाच्या आग्नेयेस स्थित आहे आणि सुमारे ३००,००० लोक राहतात.