नांदेड : प्रतिनिधी
महालक्ष्मी सणानिमित्त गावाकडे गेलेल्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसडीपीओ कार्यालयात कार्यरत कर्मचारी गजानन कदम यांच्या घरावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याची धक्कादायक घटना १९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच शासकीय पिस्टल आणि तब्बल ३० जिवंत काडतुसे असा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १६ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
कदम हे महालक्ष्मी सणासाठी गावाकडे गेले असताना त्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. रात्री उशिरा अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्या-नगदीसह शासकीय शस्त्र आणि जिवंत काडतुसे घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. विशेषतः शासकीय पिस्टल आणि ३० जिवंत काडतुसे चोरीला गेल्याने पोलिसांनी तपासाला विशेष गांभीर्याने सुरुवात केली आहे.चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये संशयिताने तोंड बांधल्याचे दिसून येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली जात आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन तपासाच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आरोपीचा माग काढण्यासाठी श्वान पथक, सीसीटीव्ही फुटेज, डम्प डेटा तसेच विविध तांत्रिक बाबींचा आधार घेतला जात आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या अनेक पथकांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. संशयिताच्या हालचालींचा माग काढण्यासाठी विविध मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याचे समजते.
याप्रकरणी १९ सप्टेंबरच्या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरीला गेलेले शासकीय शस्त्र आणि जिवंत काडतुसे सुरक्षितरीत्या हस्तगत करणे तसेच आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली असून, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीपर्यंत लवकरच पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.















